पुणे: नैसर्गिक विधीसाठी पाळीव श्वानांना शहरातील पदपथांवर फिरवले जात असून यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. हे श्वान पदपथांवर घाण करत असून यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. महानगर पालिकेच्या घनकचरा व स्वच्छता विभागामार्फत अशा बेशिस्त श्वान मालकांवर कारवाई करणे अपेक्षित असतांना अशा श्वान मालकांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या तीन वर्षात फक्त काही लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुण्यात प्राणीप्रेमींची संख्या जास्त आहे. त्यात श्वान पाळणार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. हे नागरिक त्यांच्या श्वानांना सकाळी आणि सायंकाळी नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर फिरायला नेतात. ही कुत्री पदपथावर, रस्त्यावरच मलमूत्र विसर्जन करतात. पाळीव प्राण्यांच्या विष्ठा ही संबंधित मालकाने उचलने अथवा त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे.
मात्र, हे नागरिक रस्त्यावर विष्ठा पडून राहू देत असल्याने पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळी फिरायला जाणार्या नागरिकांना कुत्र्यांच्या विष्ठेमुळे त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. या बाबत नागरिक महापालिकेकडे वारंवार तक्रारी करत असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या घनकचरा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी ही कारवाई करण्यास कुचराई करत असल्याने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.
तीन वर्षांत बोटावर मोजण्याइतक्या कारवाया
रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्या कुत्र्यांच्या मालकांवर पुणे महागर पालिकेने गेल्या तीन वर्षात मोजकीच कारवाई केली आहे. रस्त्यांवर घाण करणार्या कुत्र्यांच्या मालकांना 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, ही कारवाई करण्यास पालिकेचे कर्मचारी उदासीन आहेत.
2023 मध्ये 221 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 45 हजार 260 रुपयांचा दंड वसूल केला. तर 2024 मध्ये 191 जणांवर कारवाई करत त्यांना 79078 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर 2025 मध्ये 14 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विशेष पथकाची स्थापना
रस्त्यावर श्वानांना घेऊन फिरणार्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने पथकाची स्थापना केली आहे. सार्वजनिक ठिकाणं, रस्ते किंवा फूटपाथवर अनेक जण किंवा त्यांचे ‘केअर टेकर’ हे त्यांच्या घरातील कुत्र्यांना घेऊन फिरायला येतात. हे श्वान रस्त्यावर, फूटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी विष्ठा करतात. त्यामुळे परिसरअस्वच्छता होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पालिकेचे पथक अशांवर कारवाई करत असते. मात्र, गेल्या काही वर्षात मोजक्याच कारवाया करण्यात आल्या आहेत.
श्वान पाळण्यासाठी परवाना आवश्यक
प्राणिप्रेमी नागरिकांना आता कुत्री पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना बंधनकारक आहे. हा परवाना देताना आरोग्य विभागाने कुत्रा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याची जबाबदारी पाळणार्यांची असल्याची अट घातली आहे. शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या एक ते दीड लाखांच्यावर असतांना काही हजार नगरिकांनीच हे परवाने पालिकेकडून घेतले आहे.
पाळीव कुत्र्याने रस्त्यावर घाण केल्याचे आढळल्यास त्यांच्या मालकांना प्रत्येकी पाचशे ते हजार रुपये दंड केला जात आहे. याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. रोज चार ते पाच जणांवर कारवाई केली जाते.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन