पुणे : ताप आलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला प्राथमिक उपचार केंद्रात नेल्यानंतर ती अत्यवस्थ झाली. मुलीची स्थिती पाहून तिला हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणे आवश्यक होते. अॅम्ब्युलन्स बोलावण्यात वेळ न दवडता डॉक्टरांनी स्वतःच्या वाहनात घेतले. रस्त्यात येणार्या ट्राफिकला ओरडून रस्ता करून देण्यास सांगितले. त्यामुळे चार दिवसांच्या उपचारानंतर मुलीचे प्राण वाचले.
प्राणवी देगावे (रा. घोरपडी) असे त्या मुलीचे नाव आहे. तर, डॉ. विकास पाटील यांनी प्रसंगावधान राखत वेळ न दवडता त्या मुलीला हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये भरती केले. प्राणवी नर्सरीमध्ये शिकते. तिला, 1 जुलै रोजी दुपारी शाळेतून आल्यावर ताप आला होता. मुलीची आई नेहा देगावे यांनी मुलीला डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून मुलीसाठी औषधे लिहून दिली. दवाखान्याच्या बाहेर मेडिकलमधून औषधे घेईपर्यंत मुलगी अत्यवस्थ होऊन बेशुद्ध झाली.
घाबरलेल्या आईने पुन्हा डॉ. पाटील यांच्याकडे धाव घेतली. अचानक ताप वाढल्याने मुलीची स्थिती चिंताजनक झाली होती. या स्थितीमध्ये मुलीला तत्काळ अत्यावश्यक उपचार मिळणे गरजेचे होते. डॉ. पाटील यांनी वेळ न दवडता मुलीला स्वतःच्या गाडीतून नोबल हॉस्पिटलमध्ये नेले. वाटेत वाहतूक कोंडी असल्याने गाडी पुढे जात नव्हती. तेव्हा डॉक्टरांनी लोकांना विनंती करून गाडीचा मार्ग मोकळा करत चिमुरडीला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये चार दिवसांच्या उपचारानंतर मुलगी बरी झाली.