

दौंड: शहरातील बोरावकेनगर येथे मंगळवारी (दि. 25) गर्भ व मानवी अवशेष असलेल्या काही सीलबंद बरण्या सापडल्या होत्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. दौंड पोलिस स्थानकात याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता त्या गर्भची तसेच त्याच्या आईची डीएनए चाचणी करणार असल्याचे पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांनी सांगितले. दौंडच्या बोरावकेनगर येथे सीलबंद बाटलीमध्ये असलेले गर्भ व मानवी अवयव हे कोणत्या दवाखान्याचे आहेत व कोणी टाकले आहेत, याचा छडा पोलिसांनी लावला.
परंतु, वैद्यकीय अधिकार्यांचा अहवाल प्राप्त होऊन देखील पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष. याबाबत दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही सध्या हे गर्भ ज्या महिलेचे आहे, त्या महिलेचा शोध घेत आहोत. त्यानंतर त्या महिलेची व गर्भची डीएनए तपासणीकरिता पाठवणार आहोत. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात गुंतागुंत वाढली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 30 ऑगस्ट 2020 रोजी या महिलेची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाली होती. मग त्यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना कळवायला हवे होते किंवा संबंधित महिलेच्या नातेवाइकांना बोलावून तो गर्भ त्यांच्या ताब्यात देऊन त्याची विल्हेवाट लावण्यास सांगायचे होते. परंतु, तसे काहीही झाले नाही, असे पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी सांगितले.
आता डीएनए चाचणीतून काय निष्पन्न होते, हे पाहणे गरजेचे आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या अधिक चौकशीकरिता जिल्हाधिकार्यांनी एक समिती गठित केली आहे. ती लवकरच अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.