

पुणे: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) मार्जिन मनी लोन योजनेंतर्गत मंजूर रकमेतील संबंधित पाच साखर कारखान्यांची 107 कोटी 69 लाखांएवढा निधी समप्रमाणात घोडगंगासाठी राखून ठेवण्याचे आदेश यापूर्वी झाले होते.
आता संबंधित पाच कारखान्यांचा राखून ठेवण्यात आलेला निधी त्या कारखान्यांना दोन आठवड्यांच्या आत वितरित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 29 जानेवारी रोजी दिले असून, शासन निर्णयही जारी झाला आहे.
एनसीडीसीकडून मार्जिन मनी लोन योजनेंतर्गत राज्य शासनास प्राप्त झालेल्या 594 कोटी 76 लाख इतके कर्ज 21 ऑगस्ट 2024 रोजी 16 कारखान्यांना मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये रावसाहेब पवार घोडगंगा कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
त्यामध्ये दाखल केलेल्या याचिका क्रमांक 11572/2024 मध्ये उच्च न्यायालयाने 21 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार एनसीडीसीकडून मंजूर झालेल्या मार्जिन मनी लोनमधील पाच साखर कारखान्यांची समप्रमाणात 107.69 कोटी एवढी रक्कम राखीव ठेवण्यात येऊन 487.07 कोटी इतका निधी शासन निर्णयान्वये 26 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्यात आला होता.
आता उच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान संबंधित पाच कारखान्यांचा राखून ठेवण्यात आलेला निधी त्या कारखान्यांना दोन आठवड्यात वितरित करण्याबाबतचा आदेश दिले आहेत.
त्यानुसार शासनाने एनसीडीसीकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलातील राखून ठेवण्यात आलेला 107.69 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार संबंधित पाच कारखान्यांना रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.
त्यामुळे घोडगंगा साखर कारखान्यास संबधित रक्कम आता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत घोडगंगा कारखान्याशी संबंधित माजी आमदार अशोक पवार यांच्यांशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
...असे आहेत पाच कारखाने व त्यांचा निधी
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यास (चिखली, जि. सांगली) 11.70 कोटी, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यास (वाळवा, जि. सांगली) 27.56 कोटी, अशोक सहकारी साखर कारखान्यास (श्रीरामपूर, जि. अहमदनगर) 16.25 कोटी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास (पंढरपूर,जि. सोलापूर) 48.05 कोटी आणि शेतकरी सहकारी साखर कारखान्यास (औसा, जि. लातूर) 4.13 कोटी मिळून एकूण 107 कोटी 69 लाख रुपयांचा समावेश आहे.