अनर्थ टळला : तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; अशी घडली घटना

अनर्थ टळला : तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; अशी घडली घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंध संपविल्याच्या कारणातून भरदिवसा कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना गेल्या वर्षी सदाशिव पेठेत घडली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी (दि. 1) दुपारी साडेबाराच्या सुमारास सुभाषनगरमधील गल्ली क्रमांक 6 मध्ये होता होता टळली. अकरावीत शिकत असलेल्या तरुणीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथून जाणार्‍या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले. पण, त्यांनी जाताना चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकावले आणि अंदाधुंद कोयता फेकत गोंधळ घातला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

त्याच्याकडे कोयता होता, मात्र असा काही प्रकार घडला नसून, त्याने तरुणीसमोर धिंगाणा करण्याचा प्रयत्न केल्याचे खडक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोयता बाळगणार्‍या तरुणाला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. तो तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता. त्याने तरुणी बोलत नसल्याच्या रागातून हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. महेश सिद्धप्पा भंडारी (वय 22, रा. जनता वसाहत) असे कोयताधारी आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह अन्य एकाच्या विरुद्ध रात्री उशिरापर्यंत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महेश हा जनता वसाहतीत वास्तव्यास आहे, तर कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी त्याच्या ओळखीची आहे. तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत दुपारी साडेबाराच्या सुमारास सुभाषनगरमधील गल्ली क्रमांक 6 येथून निघाली होती. त्या वेळी महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. दोघे बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी महेशने तिच्यावर कोयता उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी एक महिला येथून जात असताना तिने हा प्रकार पहिला आणि ती जोरात ओरडली. महिला ओरडल्याने नागरिक जमा झाले. दोघे तरुण दुचाकी सुसाट पळवत हातात कोयता फिरवत नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू लागले. काही वेळात मोठी गर्दी झाली. त्या वेळी तरुणाने हातातील कोयता फेकून मारला आणि पळ काढला.

नागरिकांनी ही माहिती खडक पोलिसांना दिली. तत्काळ येथे पोलिस दाखल झाले. पण, तोपर्यंत दोघे दुचाकीस्वार येथून पळून गेले होते. नागरिकांनी त्यांचे फोटो व दुचाकीचे फोटो पोलिसांना दिले. माहिती घेतली असता हा तरुण जनता वसाहतीत राहत असल्याचे समजले. त्याने दुचाकी दुसर्‍या एका मित्राची आणली होती. त्या मित्राला पोलिसांनी बोलावले आहे. महेश फरार झाला होता. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला पकडून आणले. दरम्यान, पोलिसांना याबाबत विचारल्यानंतर पोलिसांनी मात्र हल्ला झाला नाही. त्याच्याकडे कोयता होता. त्याने धतींग करण्यासाठी आणल्याचे सांगितले. तसेच, कोयता खाली पडला होता, असेही सांगितले आहे.

बोलत नसल्याच्या कारणातून कृत्य

पेरुगेट चौकीजवळ कॉलेज तरुणीवर अशाच प्रकारे हल्ला झाला होता. प्रेमसंबंध संपविल्याच्या कारणातून तिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. सुदैवाने ती तरुणी बचावली होती. त्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. परंतु, आता पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती होताना टळली. सुदैवाने हीदेखील तरुणी हल्यात बचावली आहे. पण, प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार तिला मारहाण झाली, पण ती काहीच बोलली नाही. ती बोलत नाही, या रागातून हा हल्ला झाला आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news