

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचे मत मागवले आहे. या अनुषंगाने पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा एक अहवाल ससून रुग्णालयाला पाठवला आहे. त्यामध्ये दीनानाथ रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व रुग्णालयांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत, अशी माहिती परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेला अचानक पोटात वेदना आणि रक्तस्त्राव सुरू झाल्याने 28 मार्च रोजी दीनानाथ रुग्णालयात आणण्यात आले. तेथे पैशांअभावी उपचार नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दीनानाथ रुग्णालयातून महिलेला सूर्या हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे महिलेने 29 मार्च रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला. महिलेच्या प्रकृतीत
सुधारणा होत नसल्याने तिला मणिपाल हॉस्पिलटमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले. तिथे दोन दिवसांनी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीनानाथ रुग्णालयात महिलेला उपचारांविना साडेपाच तास ताटकळत ठेवल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व रुग्णालयांमधील पोलिस आणि कर्मचार्यांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपासाला सुरुवात केली आहे.
महिलेवर कोणत्या रुग्णालयात कोणत्या डॉक्टरांनी काय उपचार केले, याबाबतची सर्व माहिती अलंकार पोलिसांनी एकत्रित केली आहे. त्यानंतर याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून सोमवारी ससून रुग्णालयाला सादर केला आहे. या अहवालाबाबत ससूनमधील वैद्यकीय समितीने मार्गदर्शन करावे, असे नमूद केले आहे. दरम्यान, हा अहवाल प्राप्त झाल्यावरच संबंधित महिलेच्या बाबतीत काय हलगर्जीपणा झाला, हे स्पष्ट होणार आहे.