मंचर: राजकारणात कुणीही कुणाचा दीर्घकाळ शत्रू नसतो किंवा मित्र नसतो, असे नेहमीच बोलले जाते. याचाच प्रत्यय सोमवारी दि. 13 रोजी श्रीक्षेत्र थापलिंग येथील यात्रेत आला. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविलेले कट्टर विरोधक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम हे एकाच मंचावर पाहावयास मिळाले.
विशेषत: या वेळी वळसे पाटील म्हणाले, निकम व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून यात्रेचे चांगले नियोजन केले गेले आहे. वळसे पाटील व निकम देवाच्या यात्रेनिमित्त अनेक दिवसांनंतर एकाच मंचावर दिसल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून, मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचे देवदत्त निकम हे शिष्य म्हणून ओळखले जातात. पूर्वी एकाच पक्षात काम करणारे गुरू-शिष्य आता राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेल्या दोन वेगवेगळ्या गटात आहेत.
बाजार समिती निवडणुकीत झालेल्या वादातून वळसे पाटील व निकम यांच्यात दरी निर्माण झाली, ते एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. एकमेकांविरुद्ध त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली. त्या वेळी निकम व वळसे पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी केली होती तसेच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडत होते.
आता मात्र चित्र बदलताना दिसत आहे. श्रीक्षेत्र थापलिंग देवाच्या यात्रेत दोघेही एकाच मंचावर आल्याचे हजारो यात्रेकरूंनी पाहिले. वळसे पाटील यांनी देवाच्या दर्शनाला येत घाटामध्ये नवसाचे बैलगाडे पाहण्याचा आनंद घेतला.
या वेळी देवदत्त निकम त्यांच्या शेजारी उभे होते. या दोघांमध्ये या वेळी हितगुज झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. या वेळी वळसे पाटील यांनी श्रीक्षेत्र थापलिंग गडावरील नियोजित खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून पहिला टप्प्यात 25 लाख रुपये आणि दुसर्या टप्प्यात 25 लाख असा एकूण 50 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनीही टाळ्या वाजवून वळसे पाटलांनी कारखान्याच्या माध्यमातून देऊ केलेल्या निधी घोषणेचे स्वागत करून एकप्रकारे त्यांचे आभार मानल्याचे दिसून आले.