पुणे विमानतळावर ’डिजी यात्रा’ची सेवा सुसाट
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी यात्रा’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी या सेवेचा वापर करत आहेत. या सेवेमुळे प्रवासांचे चेकइन वेगवान होत आहे. तसेच, एखाद्या प्रवाशाने जर बॅगेज साहित्य न घेता ‘डिजी यात्रा’च्या माध्यमातून प्रवेश केला, तर अवघ्या तीन मिनिटांत त्याला विमानात प्रवेश मिळत आहे. यामुळे या सेवेचा वापर विमान प्रवाशांकडून अधिक होत असल्याचे समोर आले आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दि. 8 फेब्रुवारी 2025 पासून ‘डिजी यात्रा’ ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. यामुळे प्रवाशांचे चेकइन वेगवान झाले अन् प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी डिजी यात्रा ही सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती.
मात्र, येथे नव्याने उभारलेल्या नवीन टर्मिनलवर ‘डिजी यात्रा’ ही सेवा सुरू केलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. डिजी यात्रा सेवेसाठी लागणार्या आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत दि. 8 तारखेपासून ही सेवा सुरू केली आहे.
डिजी यात्राचे वापरकर्ते वाढताहेत
‘देशभरात 1 डिसेंबर 2022 पासून डिजी यात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत 80 लाखांहून अधिक उपभोक्ते जोडले गेले आहेत. तसेच, चार कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजी यात्राचे वापरकर्ते वाढत आहेत.
काय आहे डिजी यात्रा..?
डिजी यात्रा सेवा ही अॅपवर आधारित आहे. अॅपमध्ये सर्व माहिती उपलब्ध असल्यावर प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी रांगेत थांबायची गरज लागत नाही. प्रवाशांचा चेहराच बोर्डिंग पास असतो. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ‘डीजी यात्रा’ योजना विमानतळांवर राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, बेंगळुरू, वाराणसी येथे डिजी यात्रा सेवा सुरू करण्यात आली होती.
दुसर्या टप्प्यात पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलवर ही सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. आता ही सेवा कायम स्वरूपासाठी जुन्या टर्मिनलवर सुरू आहे. नवीन टर्मिनलवर देखील ही डिजी यात्रा सेवा फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात पुणे विमानतळ प्रशासनाला यश आले आहे. तसेच, देशातील अनेक विमानतळांवर आता डिजी यात्रा सेवा सुरू असून, तिचा लाभ विमानप्रवासी घेत आहेत.
...असा करता येईल सेवेचा वापर
प्रवाशाला डिजी यात्रा हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर आधार क्रमांक लिंक करून त्याचे सर्व तपशील अॅपवर नोंदवावे.
त्यानंतर स्वत:चा सेल्फी अपलोड करावा लागेल.
अॅप वापरादरम्यान प्रवाशाचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील.
डिजी यात्रा अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशाला चेकइनसाठी जास्त वेळ लागणार नाही.
विमानतळावर प्रवाशांचा चेहरा स्कॅन करावा लागेल.
त्यानंतर यंत्रणेत संबंधित प्रवाशांची विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याची नोंद होईल.
त्यानंतर ‘सिक्युरिटी चेकइन’ करताना सीआयएसएफचे जवान संबंधित प्रवाशाचे स्कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी करतील.
नंतर प्रवाशांना आत प्रवेश मिळेल.
प्रवाशांना चेकइनसाठी जास्त वेळ लागू नये, याकरिता आम्ही नवीन टर्मिनलवर डिजी यात्रा सेवा सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असलेली 15 ई-गेट नवीन टर्मिनलवर उभारण्यात आली आहेत. प्रवाशांकडून देखील या सेवेचा चांगला वापर होत असून, 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी नवीन टर्मिनलवर डिजी यात्रा
सेवेचा लाभ घेत आहेत.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

