

Pune BJP city president
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष मिळून ५८ जणांची निवड केली आहे. पुण्यात भाजपने पुन्हा एकदा धीरज घाटे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांची शहराध्यक्षपदी निवड केली आहे.
भाजपने आज राज्यातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून या पदांच्या नियुक्तीसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी चिंचवडची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्यात आली होती. धनंजय महाडिक यांच्या निरीक्षणाखाली पुण्यामध्ये शहराध्यक्ष पदासाठी मतदान देखील झालं होतं.
पुण्याच्या शहराध्यक्षाच्या स्पर्धेत धीरज घाटे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांची नावे चर्चेत होती. दरम्यान, धीरज घाटे यांना शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने पुन्हा एकदा संधी मिळावी अशी मागणी देखील कार्यकर्ते व घाटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. गेल्या आठवड्यात शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका जाणुन घेत त्याचा अहवाल हा निरीक्षकांनी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला होता. या निवडणूक प्रक्रियेमध्ये गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि सध्याचे अध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांचे नाव आघाडीवर होते.
शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी देखील घाटे यांनी आपल्याला कार्यकाल वाढवून द्यावा, अशी मागणी केली होती. आपल्या कार्यकाळामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आल्याने सध्याच्या कार्यकारणीला अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. अखेर पक्षाच्या कोअर कमिटीने धीरज घाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
भाजपने २०२३ मध्ये धीरज घाटे यांच्यावर विश्वास ठेवत पुणे शहराध्यक्षपदी निवड केली होती. त्यांनी देखील पक्ष नेत्यांचा विश्वास कायम ठेवत लोकसभा व निवडणुकीत भाजपला पुण्यातून मोठे यश मिळवून दिले. शहरात सदस्य नोंदणी करून घेत अनेकांना त्यांनी पक्षाशी जोडले. धीरज घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी प्रचारक म्हणून देखील काम केलं आहे. तर २०१७ ते २०२२ या कालावधीत त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक व सभागृहनेते म्हणूनही कामकाज पाहिले आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे आता लवकरच महानगर पालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी धिरज घाटे यांना पुन्हा शहराध्यक्ष केल्याने घाटे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. घाटे यांना आता शहरात नव्याने कार्यकारिणी तयार करावी लागणार आहे. त्यांना पक्षाचे सरचिटणीस, विविध मोर्चाचे शहराध्यक्ष व विविध पदांची देखील घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे ते नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार की की जुन्याच कार्यकारिणीला मुदतवाढ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहराध्यक्ष म्हणून गेल्या दोन वर्षात मोठी जबाबदारी सांभाळली आहे. या काळात पक्ष वाढीसाठी प्रामुख्याने प्रयत्न केले. या चांगल्या कामाची पावती म्हणून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाने घवघवीत यश मिळवले, या यशात पक्ष संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे. मला शहराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपचा पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत.
धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप