

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एमआयडीसीला भूसंपादन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकासकामांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरिक हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून विमानतळाचा डिपीआर सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवाय मार्च 2029 पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पाच हजार कोटी रुपये लागणार
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळ हे जुन्याच जागी म्हणजे पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, वनपुरी, एखतपूर आणि कुंभारवळण या गावातच होणार आहे. या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे.