

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी मुख्य परीक्षेचा 2025 पासून वर्णनात्मक पद्धतीने होणार्या बदलावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या असलेली बहुपर्यायी पद्धत पारदर्शक, वेगवान आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी प्रदान करणारी असल्याचे मत त्यांनी या वेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांच्या मते, 2012 पासून सुरू असलेल्या बहुपर्यायी पद्धतीमुळे ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांना क्लास-1 पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. वर्णनात्मक पॅटर्नमुळे गुणांचे एकसमान मूल्यमापन होत नाही आणि गुण दानात तफावत निर्माण होण्याची शक्यता वाढते. तसेच, 9 पेपर असलेल्या नवीन पॅटर्नमध्ये गुणांची मोठी तफावत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या अनुभवांचा उल्लेख करून, वर्णनात्मक पद्धती वेळखाऊ असून, निकाल प्रक्रियेत विलंब होतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले. नुकत्याच झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित असल्याचा दाखला देत त्यांनी वर्णनात्मक पॅटर्नवर टीका केली. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्णनात्मक परीक्षेचे साहित्य मराठीत उपलब्ध नसल्याने हा बदल अव्यवहार्य असल्याचे त्यांनी सांगितले. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा क्लास -1 अधिकारी होण्याचा मार्ग बंद होऊ देऊ नका’ अशी विनंती सध्या विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या अभ्यासक्रमाचे अनुसरण न करता
महाराष्ट्रासाठी वेगळा अभ्यासक्रम तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी पॅटर्न बदल रद्द करण्याची मागणी केली असून, ऑब्जेक्टिव्ह स्वरूप कायम ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे.