बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. जय पवारांच्या आत्या आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. जय यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांची भेट घेतल्याचे फोटोही समाजमाध्यमांवर शेअर केले.
साखरपुड्यापूर्वी गुरुवारी रात्री जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी चुलत आजोबा शरद पवार यांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर जय आणि त्यांच्या होणार्या पत्नीचे फोटो सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी जय पवार आणि त्यांंच्या भावी वधू ऋतुजा पाटील यांचे सुळे यांच्यासह पवार कुटुंबीयांतील अश्विनी पवार, मृणाल पवार, नीता पाटील, नीमा माने, रजनी इंदुलकर यांनी औक्षण केले.
जय पवार यांचा साखरपुडा 10 एप्रिल रोजी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यानिमित्त दुरावलेले पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. दिवाळीत पवार कुटुंबीयांची पाडव्याला एकत्र येण्याची परंपरा आता खंडित झाली असून, गतवर्षी दोन वेगवेगळे पाडवे पार पडले होते. या विवाह समारंभानिमित्त पवार परिवार एकत्र येण्याची चिन्हे आहेत. या लग्नाच्या तयारीबाबतही बारामतीत उत्सुकता आहे.