भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गुरुवारी बारामती येथील भय्या निंबाळकर व नितीन मोरे यांच्या इम्पेरियल हॉलमध्ये वातानुकूलित गारेगार वातावरणामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
‘श्री छत्रपती’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 431 अर्ज छाननीतून शिल्लक राहिले होते. या 431 उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुलाखती दिल्या. या वेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे हे उपस्थित होते.
मुलाखती देताना इच्छुक उमेदवारांनी स्वतःची ओळख करून देत आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करीत आहोत, आत्तापर्यंत कोणकोणती पदे भूषविली आहेत, शेती व्यवसायाच्या बाबतीत माहिती दिली. तसेच, श्री छत्रपती कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण योगदान देऊ, असेही अनेक इच्छुकांनी मुलाखतीत सांगितले.
कारखान्याचे सहा गट असून, गटनिहाय मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतींसाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व इतर सर्व पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाची ओळख सांगत मुलाखती दिल्या आहेत.
काही इच्छुकांनी स्वतःसाठी उमेदवारी न मागता मुलाखतीमध्ये आपल्या सहकार्यांची शिफारस केली, तर काहींनी युवकांना संधी देण्याची मागणी केली. मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांबरोबरच त्यांच्या सहकार्यांना देखील जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.