पंढरीस जाय। तो विसरे बापमाय॥ अवघा होय पांडुरंग। राहे धरूनियां अंग॥
न लगे धन मान। देह भावे उदासीन॥ तुका म्हणे मळ। नाशी तत्काळ ते स्थळ॥
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340 वा आषाढी पायी वारी सोहळा बुधवार (दि. 18) दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्याची देहू देवस्थान संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. (Pune News Update)
पहाटे पाच वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख हभप दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा व आरती होणार आहे.
पहाटे 5.30 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी पूजा व आरती करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 11 श्री तुकोबारायांच्या पादुकांची पूजा इनामदारसाहेब वाड्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर परंपरेनुसार संस्थानच्या वतीने या पादुका डोईवर घेऊन मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या जातील.
सकाळी 10 ते 12 या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सप्ताहाची सांगता होईल.
दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवर व महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांना महाभिषेक घालून महापूजा करण्यात येईल. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होईल.
प्रमुख दिंड्याच्या उपस्थित आणि वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात, गरुड, टक्के यांचा समवेत सायंकाळी पाच वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी साडे सहा वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.