

बारामती: बारामती तालुक्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे थंड आणि रसाळ फळांची मागणी वाढली आहे. कलिंगड, टरबूज, द्राक्ष, संत्रा आणि मोसंबी या थंडावा देणार्या फळांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. विशेषतः रसासाठी या फळांची मागणी वाढली आहे.
ठिकठिकाणी सुरू झालेल्या ज्यूस विक्रेत्यांकडेही फळांच्या ज्यूससाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. बारामतीत गणेश भाजी मंडई परिसर, निरा - बारामती रस्ता आणि तालुक्याच्या विविध भागातून जाणार्या राज्य मार्गावर कलिंगड, खरबूज खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत या फळांची मागणी कायम राहणार आहे. त्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे.
बारामतीच्या बागायत पट्ट्यात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून या भागातही शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. कोथिंबीर, आले, टोमॅटो, वांगी, मिरची या पालेभाज्यानंतर अनेक शेतकर्यांनी शेतामध्ये कलिंगड आणि खरबूज ही उन्हाळी पिके घेतली आहेत.
कमी कालावधीत पीक निघत असल्याने शेतकर्यांना याचा फायदा होत आहे. उन्हामुळे बारामती शहरातील सर्व आइस्क्रीम पार्लर दुपारच्या सत्रात फुल्ल होत आहेत. प्रचंड उन्हाने बारामतीकर हैराण झाले असून बळीराजा सकाळच्या सत्रातच शेतातील कामे उरकून घेत आहे.
उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, काकडी यांना असलेली वाढती मागणी लक्षात घेत बारामती तालुक्यात शेतकरी त्याचे उत्पादन घेत आहेत. अनेक शेतकरी शेतमाल तोडून तो टेम्पो, ट्रॅक्टरमधून आणत बारामती शहरासारख्या ठिकाणी त्याची घाऊक दरात विक्री करत आहेत. त्यातून उत्पन्नाचा चांगला मार्ग त्यांच्यासाठी निर्माण झाला आहे.
बारामतीत फळांचे दर स्थिर
बारामतीतही मार्च महिन्यापासून रसदार फळांची आवक वाढली आहे. अनेक शेतकर्यांनी खरबूज आणि कलिंगडाची लागवड केली असून शेतकर्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. खरबूज आणि कलिंगडाला घाऊक बाजारात किलोस 10 ते 12 रुपये दर मिळत आहे. सर्वच फळांना दर्जानुसार दर मिळत आहे. आवक आणि मागणी सारखीच असल्याने या फळांचे दर स्थिर आहेत.