मदनवाडी तलावातील अतिक्रमण हटविण्यास विलंब

कारवाईकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप
Pune news
मदनवाडी तलावातील अतिक्रमण हटविण्यास विलंबPudhari
Published on
Updated on

शिर्सुफळ: खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सिंचन उपविभाग इंदापूर यांना मदनवाडी तलावातील अतिक्रमणाची ड्रोनद्वारे मोजणी करून अतिक्रमणे हटविण्याचे आदेश चार महिन्यांपूर्वी दिले आहेत. परंतु इंदापूर भूमिअभिलेख कार्यालयाकडून अद्याप मोजणी झालेली नाही. त्यामुळे अतिक्रमण कारवाईला देखील दिरंगाई होत असल्याचा आरोप सिद्धेश्वर निंबोडीचे सरंपच संतोष सोनवणे यांनी केला आहे.

मदनवाडी तलावाचे क्षेत्र 170 हेक्टर आहे. यातील 100 ते 150 एकर क्षेत्रात केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी सिद्धेश्वर निंबोडी ग्रामपंचायतने खडकवासला पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते तसेच उपोषणाचा इशारा दिला होता.

त्यावर खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तलावातील अतिक्रमणाची ड्रोनद्वारे मोजणी करण्याचे आदेश इंदापूर येथील सिंचन उपविभागाला दिले होते. त्यानंतर सिंचन उपविभागाने इंदापूर येथील भूमिअभिलेख कार्यालयाला ड्रोनद्वारे अतिक्रमणाची मोजणी करण्याबाबत पत्र दिले. मात्र, अद्यापही मोजणी झालेली नाही.

ती का केली जात नाही, याचे उत्तरही दिले जात नाहीत. त्यामुळे अतिक्रमणाचा विळखा वाढून तलावांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे मत शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या संदर्भात खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अतिक्रमणामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात

मदनवाडी तलाव हा 1972 मध्ये बांधण्यात आला आहे . या तलावामध्ये गाळाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. गाळ उपसा करण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत. अतिक्रमणामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे तलावाचे तातडीने सर्व्हेक्षण करून अतिक्रमण हटविणे गरजेचे बनले आहे. अन्यथा येणार्‍या काळात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

अतिक्रमणधारक शेतकर्‍यांना नोटीस

अतिक्रमण केलेल्या 100 शेतकर्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तलावाची मोजणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच अतिक्रमणात वाढ होत असल्याने तलावाचा आकार व पाणी पातळीत घट झाली आहे.

पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकर्‍यांकडून आर्थिक व्यवहार करून तलावातील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहेत. 2017 पासून आम्ही पाठपुरावा करत असताना देखील अधिकार्‍यांचे व अतिक्रमणधारक शेतकर्‍यांचे लागेबांधे आहेत. मदनवाडी तलावातील अतिक्रमण न काढल्यास अधिकार्‍यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल.

-संतोष सोनवणे, सरपंच, सिद्धेश्वर निंबोडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news