बाजार समितीच्या तपासणीत दिरंगाईच; पणन संचालकांचे आदेश धुळखात

बाजार समितीच्या तपासणीत दिरंगाईच; पणन संचालकांचे आदेश धुळखात

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे बहुतांशी वर्चस्व असलेल्या मुंबई आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील साडेचार वर्षांच्या तपासणीचे आदेश   19 ऑक्टोबर 2022 रोजी दिले. त्यानुसार पंधरा दिवसांत तपासणी अहवाल सादर करणे अपेक्षित असताना जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही तो दाखल न झाल्याने नियुक्त केलेल्या समितीचे पथक कुचकामी ठरत असल्याची बोंब सुरू झाली आहे.

राज्यात उलाढाल आणि उत्पन्नात पुणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अग्रक्रम येतो. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी- विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 40 (अ) व नियम 117 अन्वये या समितीच्या कामकाजाच्या दि. 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2023 या साडेचार वर्षांच्या कालावधीतील कामकाजाच्या तपासणीचे आदेश पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिले. त्यासाठी पणन सह संचालक दीपक शिंदे यांची तपासणी अधिकारी (प्राधिकृत) म्हणून नियुक्ती करत अधिकारी- कर्मचार्‍यांचा फौजफाटाही मदतीस देऊन समितीचे लेखापरिक्षण व तपासणी करून अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते.

भाजप- शिंदे सरकारमध्ये पणन मंत्री पद प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तर महायुतीमध्ये अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पणन मंत्री पदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली. असे असताना सत्तार यांनी बाजार समित्यांच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात करत अजित पवार गटाचे वर्चस्व व सर्वपक्षीय संचालकांचा भरणा असलेल्या मुंबई आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रडारवर घेत तपासणीच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत होते. असे असताना तपासणीत होत असलेल्या दिरंगाईने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

नुकतेच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले असून त्याठिकाणी या दोन्ही बाजार समित्यांच्या तपासणीबाबतच्या विषयावर अंतर्गत चर्चा झाल्याचे समजते. पुणे बाजार समितीवर तर जवळपास 19 वर्षांनंतर संचालक मंडळ सत्तारुढ झाले असून तत्पूर्वीची तपासणी ही शासन नियुक्त प्रशासकीय अधिकार्‍यांच्या काळातीलच असल्याचे चर्चेत नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आदेशानुसार वेळेत तपासणी होण्याऐवजी अहवाल सादर करण्यास झालेल्या दिरंगाईवर पणन संचालक डॉ. केदारी जाधव कोणती कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबत डॉ. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news