हरणाला माणसांसह पाळीव प्राण्यांचा लळा!

हरणाला माणसांसह पाळीव प्राण्यांचा लळा!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : हरीण, काळवीट असे वन्यप्राणी माणसे, तसेच गाई, बैल अशा पाळीव प्राण्यांपासून दूर राहतात. माणसांची चाहूल लागली तरी ते जंगलात धाव घेतात. असे असले तरी पानशेतजवळील आंबी येथील जनावरांच्या गोठ्यांत गेल्या महिन्याभरापासून एक हरीण मुक्कामी राहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे चितळ प्रजातीचे नर हरीण असून त्याला गोठ्यातील गाई-वासरांचा लळा लागला आहे.

आंबी गावच्या शेजारील घनदाट जंगलात शेतकरी व मावळा जवान संघटनेचे प्रवक्ते शंकरराव निवंगुणे व बबन निवंगुणे यांच्या घराच्या परसबागेत जनावरांचा गोठा आहे. गोठ्यात गाई, बैल व वासरे अशी एकूण 15 जनावरे आहेत.

हरणाचा गोठ्यात मुक्काम..

गेल्या महिन्यापासून हरीण रात्री आठच्या सुमारास जंगलातून गोठ्यात येत आहे. जनावरांसाठी ठेवलेले गवत खाऊन ते रात्रभर गोठ्यात मुक्काम करते आणि सकाळी सातच्या सुमारास निघून जाते. या हरणाचा रंग फिकट लाल असून त्यावर चंदेरी (पांढरे) ठिपके आहेत. त्याची दोन्ही शिंगे भरीव आहेत.

शिकार करणार्‍यांचा बंदोबस्त करा

सिंहगडपासून पानशेत वरसगाव रायगड जिल्ह्याच्या हद्दी पर्यंत घनदाट जंगले आहेत. या जंगलात हरिण, मोर लांढोर, रान डुक्करे, राणकोंबडे, ससे, सायाळ, भेकर, रानमांजर, बिबटे, साप, सरडे, घोरपड आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहेत. मात्र, अलीकडे काळात येथील डोंगर रांगात बांधकामे सुरू झाली आहेत. यामुळे वन्यप्राणी सुरक्षित नाहीत. या भागातील शिकार्‍यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

कोटआंबी येथे खासगी जंगले मोठ्या प्रमाणात असून, या भागात हरीण, चिंकारा, मोर आदी वन्यजीवांचा अधिवास आहे. जंगलातील हरीण अन्न-पाण्यासाठी निवंगुणे यांच्या गोठ्यात येते आणि दिवस उजाडल्यावर जंगलात त्याच्या अधिवास क्षेत्रात निघून जाते. त्यामुळे त्याला पकडणे योग्य नाही. त्यावर आमचे लक्ष आहे.

समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वनविभाग

 

पानशेत, वेल्हे परिसरात वन्यप्राण्यांची शिकार करणारे अनेक समाजकंटक मोठ्या संख्येने आहेत. ते या हरणाची शिकार करतील अशी भीती आहे.

शंकरराव निवंगुणे, शेतकरी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news