वेल्हे : पुणे शहर व परिसरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे. बुधवारी (दि. 11) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 5.33 टीएमसी म्हणजे 18.28 टक्के साठा शिल्लक होता.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या डोंगरी पट्ट्यात पावसाळी वातावरण आहे. मात्र, वार्यासह ढग विरळ होऊन ऊन पडत आहे. पावसाची उघडीप व पिण्यासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट सुरू आहे.
रविवार (दि. 8) पासून धरणक्षेत्रात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक थंडावली आहे. सलग चार दिवस पावसाने उघडप घेतली. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 5.33 टीएमसी म्हणजे 18.28 टक्के साठा शिल्लक होता.
या वर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर ऐन मान्सूनमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत पाऊण टीएमसीपेक्षा अधिक पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 11 जून 2024 रोजी धरणसाखळीत 4.08 टीएमसी पाणी होते.
गेल्या आठवड्यात बुधवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 5.54 टीएमसी पाणी साठा होता. गेल्या 8 दिवसांत पाणी साठ्यात 0.21 टीएमसीची घट झाली. मान्सूनच्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली नाही. मात्र, किंचित भर पडल्याने पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर बुधवारी (दि.11) दिवस अखेर खडकवासलात 45.72 टक्के, पानशेतमध्ये 14.29 टक्के, वरसगावमध्ये 21 .92 टक्के व टेमघर धरणामध्ये 2.52 टक्के पाणीसाठा होता.