Assembly Elections | घटत्या मतदानाचा भाजपला धोका; तर आघाडीत उमेदवारनिवडीचे आव्हान

Assembly Elections | हे घटते मताधिक्य महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Maharashtra Assembly Election
Assembly Electionsfile photo
Published on
Updated on

पुणे : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मागील काही निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांचे मताधिक्य वरचेवर घटत आहे. हे घटते मताधिक्य महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

(Maharashtra Assembly Election)

Maharashtra Assembly Election
574 संगणक परिचालकांवर टांगती तलवार

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर इच्छुकांची संख्या वाढल्याने महाविकास आघाडीतील पक्षांसमोर जागा पदरात पाडून घेण्यासोबतच उमेदवार निवडीचे आव्हान राहणार आहे.

खडकवासला विधानसभा मतदार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मनसेचे रमेश वांजळे यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी हषर्दा वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली.

या पोटनिवडणुकीत भाजपचे माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांनी हषर्दा वांजळे यांचा ३ हजार ६२५ मतांनी पराभव करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला. त्यानंतर २०१४ ला मोदी लाटेत ते पुन्हा विजयी झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांना खडकवासल्यात तब्बल ६५ हजार ४९४ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला विजयासाठी चांगलेच झगडावे लागले.

तापकीर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी चांगलाच घाम काढला. पाच वर्षे सत्ताधारी आमदार असतानाही तापकीर यांना विजयासाठी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागली. शेवटी २ हजार ५९५ मतांनी दोडके यांचा निसटता पराभव झाला आणि तापकीर विजयी झाले.

दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून राज्याची सत्ता हस्तगत केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये सहभागी झाला.

या सर्व घडामोडींनंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. महायुतीच्या नेत्यांनी बारामती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यावर सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे गणित तयार केले होते.

या दोन्ही मतदारसंघांतून सुनेत्रा पवार यांना प्रत्येकी एक लाखाचे लीड मिळेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना होता. मात्र, प्रत्यक्षात खडकवासल्यातून सुनेत्रा पवार यांना केवळ २० हजार ७४६ मतांचे लीड मिळाले. गत लोकसभा निवडणुकीमध्ये खडकवासल्यामध्ये युतीच्या उमेदवाराला मिळालेले ६५ हजारांचे लीड यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २० हजारांवर आल्याने फोडाफोडी आणि महायुतीचा प्रयोग भाजपच्या पारंपरिक मतदारांना रुचलेला नाही, हे स्पष्ट झाले.

या सर्व पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात नक्की काय होणार? याबाबत उत्सुकता आहे. जागा वाटपाच्या सूत्रानुसार खडकवासल्याची जागा महायुतीमध्ये भाजपला, तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटू शकते. भाजपकडून विद्यमान आमदार तापकीर पुन्हा इच्छुक आहेत.

याशिवाय माजी नगरसेवक दिलीप वेडे नीप वेडे पाटील, प्रसन्न जगताप, राणी भोसले हे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाकडून माजी नगरसेवक सचिन दोडके पुन्हा उमेदवारीचे दावेदार आहेत. याशिवाय बाळा धनकवडे, काका चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे इच्छुक आहेत. याशिवाय महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शिवसेनेकडून (शिंदे गट) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश कोंडे यांनीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्हा बँकेत आणि मार्केट यार्ड निवडणुकीत करिष्मा दाखविणारे माजी नगरसेवक विकास (नाना) दांगट हे महायुतीकडून इच्छुक आहेत. याशिवाय दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूर वांजळे यांनी विधानसभा लढण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांनी ते नेमके कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत, याचे पत्ते उघड केलेले नाहीत.

दांगट आणि वांजळे यांच्या फ्लेक्सवर सध्यातरी कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याने ते कोणाकडून निवडणूक लढविणार, हे गुलदस्तात आहे. तर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत असले, तरी त्यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला, तरी अजूनतरी तुल्यबळ इच्छुक समोर आलेला नाही. मात्र, ऐनवेळी इतर पक्षांतील एखादा तुल्यबळ इच्छुक मनसेच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Assembly Election
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, १९ ऑगस्‍ट २०२४

स्वपक्ष, मित्रपक्षांची मोट बांधावी लागणार

राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, वरचेवर घटणारे मताधिक्य, मनसेचा स्वबळाचा नारा, मित्रपक्षांतील इच्छुकांची गर्दी, या पार्श्वभूमीवर भाजपसाठी विधानसभेची निवडणूक सोपी असणार नाही.

लोकसभा निवडणुकीसारखेच यश संपादन करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेच्या इफेक्टचा सामना करीत सरकारचे अपयश लोकांसमोर मांडून मते खेचावी लागणार आहेत. एकंदरीत, महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला स्वपक्षासह मित्रपक्षांतील इच्छुकांना सोबत घेऊन यश संपादन करावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news