खडकवासला: पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळीत सलग सातव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी, धरण साखळीतील एकूण पाणीसाठ्यात घट नोंदवली जात असून, गेल्या 24 तासांत 0.9 टीएमसीने साठा कमी झाला आहे. गुरुवारी (दि. 7) सायंकाळी 5 वाजेपर्यंत साखळीतील एकूण पाणीसाठा 25.88 टीएमसी म्हणजेच 88.78 टक्के इतका होता, तर बुधवारी (दि. 6) तो 25.97 टीएमसी होता.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले की, ’पावसाने उघडीप दिल्यानंतर आजपासूनच प्रथमच साठ्यात किंचित घट सुरू झाली आहे. ही घट अल्प प्रमाणात आहे. खडकवासला धरणातून खरीप हंगामासाठी शेतीसाठी पाणी आवर्तन सुरू आहे. तसेच शहर आणि परिसराला नियमित पाणीपुरवठाही सुरू आहे. अद्याप पावसाची शक्यता असून, लवकरच साठ्यात भर पडेल. (Latest Pune News)
गेल्या वर्षी याच दिवशी, म्हणजे 7 ऑगस्ट 2024 रोजी, साखळीत 26.75 टीएमसी (91.77 टक्के) इतका पाणीसाठा होता. यंदाच्या तुलनेत केवळ एक टीएमसीनेच फरक आहे. त्यामुळे येणार्या काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
गुरुवारी दिवसभर पानशेत, वरसगाव आणि सिंहगड-मांडवी भागात ढगाळ हवामान होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली. घाटमाथा व मुठा खोर्यात नद्या, ओढे, नाले मंद गतीने वाहत आहेत. सिंहगड व मांडवी भागातील प्रवाह मात्र जवळपास थांबले आहेत.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
गुरुवारचा पाणीसाठा
25.88 टीएमसी (88.78 टक्के