दौंड-इंदूर एक्स्प्रेस आठ तास लेट; प्रवाशांना नाहक मनस्ताप

दौंड-इंदूर एक्स्प्रेस आठ तास लेट; प्रवाशांना नाहक मनस्ताप
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दौंडहून मध्य प्रदेशातील इंदूर शहरासाठी धावणारी रेल्वेगाडी (गाडी क्र. 22943) बुधवारी (दि. 29) तब्बल आठ तास उशिरा धावली. त्यामुळे प्रवाशांची नियोजित कामे रखडली, ती वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. प्रवाशांना स्थानकावरच वेटिंग करावे लागल्याने त्यांना नाहक मनस्ताप झाला.  गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या अनेक गाड्या 12 ते 18 तासांनी उशिराने धावत आहेत. यात विशेष गाड्या लेट होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर अंथरूण-पांघरूण घेऊन राहण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने पहाटे अडीचच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करून वृत्त प्रसिध्द केले होते.

तसेच, गाड्यांना सातत्याने होणार्‍या उशिराबाबत अनेक वृत्ते दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिध्द केली जात आहेत. मात्र, ढिम्म रेल्वे प्रशासनाला याचा कोणताही फरक पडत नसून, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक रामदास भिसे काय कार्यवाही करणार, हे पाहावे लागणार आहे. तसेच, पुणे रेल्वे स्थानक गर्दीमुळे 'निवारागृह' बनले आहे, त्यामुळे येथे अनुचित घटना घडण्याची मोठी शक्यता आहे, या रोखण्यासाठी वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा, पुणे रेल्वे स्थानक आरपीएफ निरीक्षक सुनील यादव, लोहमार्ग पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड काय उपाययोजना करणार, हेसुद्धा पाहावे लागणार आहे.

वेस्टर्न रेल्वेच्या विभागात पालघरजवळ एक मालगाडी रुळावरून उतरली होती. त्यामुळे बहुसंख्य गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे पुण्यातून धावणार्‍या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.

– रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे

मनस्तापाची भरपाई रेल्वे देणार का?

याबाबत एक रेल्वे प्रवासी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, दौंड- इंदूर एक्स्प्रेस दुपारी 2 वाजता सुटणार होती. बराच वेळ झाला. मात्र, स्थानकावर गाडी आली नाही. स्थानकावरील अधिकार्‍यांना या वेळी विचारणा केली असता, त्यांनी ही गाडी रात्री 10 वाजता सुटणार असल्याचे सांगितले. यामुळे आम्हाला 8 तास वाट पाहावी लागणार होती. परिणामी, पुढील नियोजित रेल्वे सुटण्याची शक्यता होती. आमच्यासोबत सुमारे 100 ते 200 महिलांचा ग्रुप होता. नाइलाजास्तव आम्हाला रेल्वेचे तिकिटे आणि सीट सोडून खासगी गाडी करून पुढील प्रवास करावा लागला. या प्रवासाचे आणि रेल्वे तिकिटाचे पैसे रेल्वे आम्हाला देणार आहे का? तसेच आम्हाला झालेल्या मनस्तापाची भरपाई रेल्वे करून देणार आहे का?

बुधवारी या गाड्या धावल्या उशिरा

रेल्वेगाड्यांना सातत्याने उशीर होत आहे. बुधवारी दौंड-इंदूरसह पुणे-जयपूर सुपरफास्ट, हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-दानापूर एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, अहिंसा एक्स्प्रेससह अनेक गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे रेल्वेप्रवाशांना नाहक त्रास झाला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news