

Daulat Shitole vs Sharad Sonawane
निमोणे : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी, फासेपारधी समाजाबद्दल काढलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी दिला आहे.
शितोळे यांनी म्हटले की, काय भाग्य आहे पाहा आमचं! स्वातंत्र्याची जवळजवळ ८० वर्षे झालीत, तरी आजही कायदे मंडळाचा सदस्य, त्यांच्या भागात चोऱ्यामाऱ्या होतात म्हणून रामोशी, फासेपारधी जातीला जबाबदार धरतोय, तुमच्या व्यवस्थेत आम्ही मुकी माणसे जे तोंडाला येईल ते तुम्ही बोलणार; पण आमदारसाहेब आमचा इतिहास थोडा डोकावून पाहा. आम्ही चोऱ्या करणारे नाही. आम्ही गावगाड्याचे वेळप्रसंगी रक्त सांडून संरक्षण करणारी माणसे आहोत, आमच्या जातीवरून तुम्ही आम्हाला गुन्हेगार ठरवत असाल, तर हे या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
जुन्नरचे अपक्ष आणि शिंदे शिवसेनेचे सहयोगी आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघात चोऱ्या होत असून, त्या चोऱ्या रामोशी व फासेपारधी करीत असल्याचे विधान केले होते, त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र प्रचंड चीड निर्माण झाली असून, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी एक पत्रक काढून या विधानाचा निषेध केला आहे.
आमचे दुर्दैव आहे की, यांच्यासाठी आम्ही जाहीर सभा घेतल्या, त्यांना निवडून आणण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकांनी मतदान केले आणि आज हे जातीच्या नावावर माणसांना गुन्हेगार ठरवायला लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की, जातीवरून माणसाला गुन्हेगार ठरवणे, ही तुमच्या शिवसैनिकाची भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे.