

पुणे : दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या आणि दारू सोडा, दारूचा पाश जीवनाचा नाश, दारू सोडा आनंद जोडा, अशा घोषणा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि महाविद्यालयीन तरुणाईने चार्लीच्या वेशातील कलाकारासह जनजागृती केली.
नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू न पिता दूध पिऊन करावे, असा संदेश देत दूधवाटप करण्यात आले.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, आपलं फाउंडेशन, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि कात्रज डेअरी यांच्यातर्फे 'दारू नको, दूध प्या' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, नीलेश शिंदे, राहुल बोम्बे, अनुपकुमार कुंडीतकर, कात्रज डेअरीचे अनिल ठोंबरे, तुषार पिंगळे, मराठवाडा मित्रमंडळचे प्रा. दशरथ गावित, फाउंडेशनचे मनीष भोसले आदी उपस्थित होते. यंदा उपक्रमाचे १७ वे वर्ष होते.
डॉ. दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारू पिऊन करते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधिनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी, यासाठी दुधाचे वाटप करून 'दारू नको दूध प्या' हा उपक्रम राबविला जातो.