

पुणे : ‘मुरासू’ चक्रीवादळ आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर धडकताच त्याचा वेग वाढला आहे. दक्षिण किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला असून, गत २४ तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या सहा जिल्ह्यांतच बुधवार (दि. ४) पर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळ सोमवारी (दि. २) अधिकच तीव्र झाले ते वायव्य दिशेला पुढे सरकण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. ३) नेल्लोर आणि नरसपूर (आंध्र प्रदेश) किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
इंदापूरमध्ये २४ तासांत १३१ मि.मी. पाऊस
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यात सर्वाधिक पाऊस इंदापूरमध्ये झाला असून, गत २४ तासांत तेथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ बारामतीत ७७.२, शिवाजीनगर ४१, पिंपरी-चिंचवडमध्ये १९ मि.मी. पावसाची नोंद झाली.