चक्रीवादळ अन् पावसाने चाकाटी परिसराला झोडपले..!

चक्रीवादळ अन् पावसाने चाकाटी परिसराला झोडपले..!

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठी वसलेल्या चाकाटीसह पिठेवाडी, बोराटवाडी, लाखेवाडी या गावांच्या हद्दीमध्ये बुधवारी (दि. 15) रात्री दीड तास झालेल्या जोरदार चक्रीवादळ आणि पावसाने फळबागांसह शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहेत, घरांवरील पत्रे उडाले आहेत. शिवाय अनेक कोंबड्याही मृत्युमुखी पडल्या आहेत. या गावांमध्ये गुरुवारी (दि. 16) तलाठ्यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

या गावांमध्ये विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडात व जोरदार चक्रीवादळासह बुधवारी रात्री 11 ते 12.30 दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने चाकाटी येथे पिकांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक घरांवरील पत्रे उडाले, विद्युत खांब पडले, तसेच खुराड्यासह कोंबड्या उडून गेल्याने त्या मृत्युमुखी पडल्या आहेत, अशी माहिती माजी सरपंच रामभाऊ पाटील यांनी दिली. चाकाटी येथील शिवाजी महादेव मारकड यांची 2.5 एकर आंब्याच्या बागेतील सुमारे 2 ते 2.5 टन फळगळ होऊन त्यांचे अंदाजे 4 ते साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

लाखेवाडी ते खाराओढा रस्ता झाडे पडल्यामुळे बंद होता. तसेच, चक्रीवादळी पावसाने या चाकाटी, बोराटवाडी, पिठेवाडी व लाखेवाडी 4 गावांमध्ये चारा पिकांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी उसाचे पीकदेखील जमिनीवर लोळल्याचे दूधगंगा दूध संघाचे संचालक दयानंद गायकवाड (बोराटवाडी), किरण पाटील (चाकाटी), दत्तात्रय जाधव आणि तानाजीराव घोगरे (खाराओढा-लाखेवाडी) यांनी सांगितले.

बावडा येथे वीज कोसळली

बावडा (ता. इंदापूर) येथे बलभीम सुदाम घोगरे यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर मंगळवारी (दि. 14) रात्री वीज कोसळली. बावडा परिसरात मंगळवारी अवकाळी पावसाचे आकाश भरून आले असता, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू असताना मोठा आवाज होऊन लालबुंद गोळा नारळाच्या झाडावर पडून आग लागली. त्यामुळे नारळाचे झाड आगीत जळून गेले. यामुळे अन्य काहीही नुकसान झाले नाही, असे प्रा. घोगरे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news