

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणार्या अजय अंकुश निकाळजे (वय 22, रा. त्रिमूर्ती हॉस्पिटलजवळ, धायरी फाटा) यास न्यायालयाने जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला.
दिशा निकाळजे (वय 19) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रारंभी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. (Latest Pune News)
ही घटना 20 ऑगस्ट 2021 रोजी धायरी फाटा परिसरात त्रिमूर्ती हॉस्पिटलजवळच्या व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये घडली होती. याप्रकरणी अजयला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे बारा साक्षीदार तपासले. त्यामध्ये चार साक्षीदारांसह तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सायबर तज्ज्ञाची साक्ष महत्त्वाची ठरली.
चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीचा खून केला. त्यानंतर एका मित्राला फोन करून गुन्ह्याची न्यायबाह्य कबुली दिली, तर दुसर्या मित्राकडे पैसे मागितले. आरोपीला पत्नीसोबत भांडताना पाहिल्याचे इमारतीत राहणार्या दुकानचालकाने सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरणातही आरोपी घरातून बाहेर पडल्यावरच तिथे पत्नीचा मृतदेह सापडल्याचे निदर्शनास आले, अशा महत्त्वपूर्ण बाबी अॅड. सप्रे यांनी युक्तिवादादरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
गुन्ह्याच्या दिवशी घरी पती-पत्नीमध्ये झालेले भांडण, गुन्ह्याबाबत आरोपीने मित्राकडे दिलेली कबुली, आरोपीच्या हातावर खरचटल्याच्या जखमा, घरात पती-पत्नीला भांडताना पाहणार्या दुकानचालकाची साक्ष अशा परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी आणि ’लास्ट सीन थिअरी’ आधारे आरोपीनेच पत्नीचा खून केल्याचे सरकार पक्षाने सिद्ध केल्याचा निष्कर्ष नोंदवित न्यायालयाने आरोपीला जन्मठेप ठोठावली. या प्रकरणात अंमलदार संजय पुणेकर यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.