पुणे: लोणी काळभोर भागातील रामदारा परिसरात असलेल्या गावठी दारू बनविणार्या हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने कारवाई केली. येथून पोलिसांनी दीड हजार लिटर तयार दारू, 20 हजार लिटर रसायन आणि दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा अकरा लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रात्रीच्या वेळी कारवाई करताना अंधाराचा फायदा घेऊन आरोपी मुकेश कर्णावत हा पसार झाला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलिस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते.
त्यादरम्यान रामदरा भागात हातभट्टीवर दारू बनविण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, अंमलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर यांच्यासह पथकाने छापा टाकला. पोलिस आल्याची चाहुल लागताच आरोपी कर्णावत याने तेथून पळ काढला.
पोलिसांनी येथून दीड हजार लिटर तयार दारू, 20 हजार लिटर रसायन आणि दारू बनविण्यासाठी लागणारे मोटार, ड्रम, एअर ब्लोअर असा एकूण 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट सहाचे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.