Pune Crime: आर्थिक व्यवहारातून तमिळनाडूच्या तरुणाचे अपहरण करणार्या सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. दरम्यान, अपहृत तरुणाची आरोपींच्या तावडीतून पोलिसांनी सुखरूप सुटका केली. एस. व्यंकटेशम् असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मोहमद मेहेरबान (वय 27), अर्जुनकुमार शिवकुमार (वय 28), देवेंद्र अलभर (वय 25), अंकित अडागळे (वय 25), प्रियांक राणा (वय 33), अविनाश कदम (वय 43) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुटका करण्यात आलेला तरुण मूळचा तमिळनाडूतील आहे. आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत.
आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले होते. अपहरण करण्यात आलेला तरुणाला नोकरीची गरज होती. त्यासाठी त्याने ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज केला होता. त्यातून त्याला रमेश नावाच्या व्यक्तीने संपर्क साधून नोकरी देतो असे सांगितले. त्यातूनच त्याने तरुणाला मुंबई येथे पाठवले. आरोपींना रमेश याच्याकडून एक सॉफ्टवेअर विकत घ्यायचे होते. त्यासाठी काही पैसे त्यांनी पाठवून दिले होते. अपहरण करण्यात आलेला तरुण मुंबईत आला होता.
रमेशसोबत आरोपींचा संपर्क होत नव्हता. शिवाय त्यांचे पैसे देखील मिळत नव्हते. त्यामुळे आरोपींनी तरुणाला गाडीतून पुण्यात आणले. त्यांनी येथील एका हॉटेलवर रमेशकला डांबून ठेवत मारहाण करून त्याकडे पैशांची मागणी करत होते. तरुणाच्या घरच्यांनी भीतीपोटी आरोपींना एक ते सव्वा लाख रुपये पाठवून देखील दिले.
दरम्यान, हा प्रकार पुणे पोलिसांना समजताच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना सोलापूर रस्त्यावरील एका लॉजमधून अटक केली. त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका केली. त्यांनी तपास करून अपहृत तरुणाची सुटका करून आरोपींना अटक केली.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार, गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे, युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक चंद्रकांत बेरड आणि पथकाने ही कारवाई केली.