
Exam Hall Ticket: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर काही चुका झाल्या असतील, तर त्या शाळांमार्फत दुरुस्त करता येणार आहेत.
यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्म दिनांक, प्रवर्ग इत्यादी दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने नोंद करता येणार असून, त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
दहावीचे हॉलतिकीट येत्या 20 जानेवारीपासून उपलब्ध आहे. दुरुस्ती मान्य झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे सुधारित हॉल तिकीट हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील, असे देखील राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
शाळांनो, हॉलतिकीट विनाशुल्क उपलब्ध करून द्या!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणार्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळांनी प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख
दहावी आणि बारावीच्या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा हॉल तिकिटात बोर्डाकडून काही बदल करण्यात आले आहेत. यामधील एक बदल म्हणजे विद्यार्थ्याच्या जातीचा प्रवर्ग सुद्धा हॉल तिकिटावर नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्याचे नाव, सीट नंबर, सेंटर, आईचे नाव, शहर यांचा उल्लेख असायचा. मात्र, यंदाच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख सुद्धा करण्यात आला आहे.