आता पुणेकरांच्या सुरक्षेसाठी ‘कॉप्स-24’चे कवच; मिळणार तत्काळ मदत

बीट मार्शलचे होणार अद्ययावतीकरण; संकटात असाल तर तत्काळ मिळणार मदत
Police
आता पुणेकरांच्या सुरक्षेसाठी ‘कॉप्स-24’चे कवच; मिळणार तत्काळ मदतFile Photo
Published on
Updated on

पुणेः तुम्ही पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल देताच मदतीसाठी धावून येणारे बीट मार्शल आता कॉप्स-24 या नावाने ओळखले जाणार आहेत. पोलीस ठाण्याचा बीट मार्शल हा उपक्रम बंद होणार असून, त्याची जागा कॉप्स-24 घेणार आहेत. अंमलदारांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू असून, त्यांच्यासाठी वेगळा ड्रेसकोड असणार आहे.

गुन्हे शाखेच्या खांद्यावर कॉप्सच्या नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिवस आणि रात्रपाळीत त्यांचे कामकाज चालणार आहे. सीआर मोबाईलसाठी 234 तर कॉप्ससाठी 492 अशा 726 महिला आणि पुरुष अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, परिणामकारक पेट्रोलिंग, अडचणीतील नागरिकांना तत्पर पोलीस मदत, पोलिसांचा रस्त्यावरील वावर, नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण तयार करून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याकरीता कॉप्स-24 हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे पोलिसांकडून सध्या पोलीस ठाणे स्तरावर बीट मार्शल ही संकल्पना राबविले जाते. प्रत्येक पोलीस चौकीला रात्री आणि दिवसपाळी दोन-दोन अंमलदार बीट मार्शल म्हणून काम करतात. पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर त्यांची संख्या असते.

रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यासह एखादा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण सोबतच त्यांना अडचणीच्या काळात त्वरीत मदतीसाठी ही बीट मार्शल ही संकल्पना राबविली जात होती.

मात्र मनुष्यबळ तसेच पोलीस ठाण्याच्या कामाचा ताण यामुळे प्रभावी पेट्रोलिंग होत नसल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. तर काही बीट मार्शलचे भलतेच उद्योग निदर्शनास आले. त्यामुळे बीट मार्शलचा मुख्य उद्देश साध्य होत नसल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बीट मार्शलपेक्षा प्रभावी कामकाज व्हावे, यासाठी कॉप्स-24 ही संकल्पना सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर कामकाजात केले जाणार आहे. हा उपक्रम सुरू होताच पोलीस ठाण्याचे बीट मार्शल बंद होणार आहेत.

वर्तन सौदार्ह आणि सौजन्याचे

कॉप्स-24 मध्ये काम करणार्‍या अंंमलदारांना नागरिकांसोबत आपले वर्तन सौदार्ह आणि सौजन्याचे ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. विशेष महिलांचा सन्मान करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. नागरिकांना शिवीगाळ अथवा मारहाण करू नये. पोलिस दलाची प्रतिमा मलिन होऊ नये, असे वर्तन न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

असे काम करणार कॉप्स-24

कॉप्स 24 या उपक्रमातील अंमलदारांना नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या कॉलला प्रतिसाद देण्यापासून नेमून दिलेल्या ठिकाणी पेट्रोलिंग करावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा वापर पोलीस ठाण्याच्या इतर कामासाठी करता येणार नाही. त्यांच्यावर नियंत्रण राहावे म्हणून प्रत्येक दोन तासाला नियंत्रण कक्ष त्यांचे लोकेशन घेणार आहे.

रिस्पॉन्स टाईम येणार 5 मिनिटांवर

  • कॉप्स - 24 मध्ये महिला आणि पुरूष मिळून 726 अंमलदार.

  • अंमलदारांची वयोमर्यादा 21 ते 30.

  • रिस्पॉन्स टाईम 7 मिनिटांवरून 5 मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न.

  • कॉप्स-24 साठी 125 दुचाकी आणि 39 चारचाकी वाहने.

  • दोन सत्रात (दिवस-रात्र) पेट्रोलिंग, प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक कार.

  • शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते तसेच नागरिकांची गर्दी असणार्‍या ठिकाणी कार उभी केली जाणार.

  • काही घटना घडल्यास, तत्काळ पोहचून मदत व प्राथमिक कार्यवाही.

बीट मार्शल हा उपक्रम अधिक प्रभावीपणे शहरात राबविण्यात यावा म्हणून त्याचे अद्ययावतीकरण करून कॉप्स-24 असे करण्यात येणार आहे. पूर्वीच्या बीट मार्शलमध्ये काही त्रुटी आढळून येत होत्या. त्याच्यावर अभ्यास करून योग्य त्या सूचना या नवीन कॉप्सला देण्यात आल्या आहेत. पोलिसांचा वावर रस्त्यांवर दिसून यावा, रिस्पॉन्स टाईम पाच मिनिटांपर्यंत कमी व्हावा, हा आमचा प्रयत्न असणार आहे. पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे हा देखील या मागील दृष्टिकोन आहे.

- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news