Baramati bypoll Election | बिनविरोधचे प्रयत्न धुसर; बारामतीत निवडणूक लागणार?

काँग्रेस लढण्यावर ठाम : 6 जणांची माघार, 47 उमेदवार रिंगणात; आज माघारीचा दिवस
Baramati bypoll Election
Baramati bypoll Election | बिनविरोधचे प्रयत्न धुसर; बारामतीत निवडणूक लागणार?
Published on
Updated on

बारामती, पुणे, मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीकडून जोरदारपणे सुरू असलेले प्रयत्न धूसर झाल्याचे चित्र बुधवारी सायंकाळपर्यंत होते. काँग्रेसने ही निवडणूक लढविण्याची आपली भूमिका कायम ठेवल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांना अपयश आले. बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार 53 वैध उमेदवारी अर्जांपैकी सहाजणांनी माघार घेतल्याने आता 47 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माघारीच्या दिवशी काय घडणार?, काही नाट्यमय घडामोडी घडणार काय? याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, बुधवारी या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी निवडणुकीविषयी चर्चा केली.

बुधवारी माघारीच्या आदल्या दिवशी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. बुधवारी दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. 59 उमेदवारी अर्जांपैकी सहा अर्ज अवैध ठरल्याने वैध उमेदवारी अर्जांची संख्या 53 झाली. या 53 वैध अर्जांपैकी सहाजणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बारामतीत ठाकरेंची शिवसेना ‘वेट अँड वॉच’वर

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अजूनही आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केली आहे. दुसरीकडे, आघाडीचा धर्म पाळायचा झाल्यास शिवसेनेला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल. दोन्ही पक्षांशी संबंध टिकवून ठेवण्याच्या रणनीतीमुळे ठाकरे गटाने सध्या ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे.

भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द

राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा महत्त्वाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी या भेटीदरम्यान दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news