यवत : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुका संपताच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत आ. कुल हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी तातडीने सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका गावोगावी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता आ. कुल यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार रमेश थोरात हे अजून निवडणूक लढवणार की नाही हे गुलदस्तातच आहे.
राज्यात महायुती कायम राहिली तर आ. राहुल कुल यांचे पारंपरिक विरोधक रमेश थोरात यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण अजित पवार जर महायुतीत राहिले, तर दौंडच्या जागेवर अजित पवारांना हक्क सांगता येणार नाही आणि रमेश थोरात हे अजित पवारांचा शब्द पडू देणार नाहीत, अशी शक्यता आहे; मात्र दुसरीकडे थोरात समर्थकांनी कसल्याही परिस्थितीत यंदा निवडणूक लढवायची असा चंग बांधला आहे.
त्यातच आता आ. कुल यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यात त्यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवा अशा सूचना सर्वच प्रमुख कार्यकर्ते मंडळींना दिल्या आहेत. आ. कुल यांनी तालुक्यात केलेली विकासकामे, वैयक्तिक आरोग्य निधी मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न तसेच बंद पडलेला भीमा-पाटस साखर कारखाना सुरू करण्यात मिळवलेले यश हे प्रमुख मुद्दे घेऊन आ. कुल निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. हे सर्व असले तरी समोर कोणते उमेदवार असणार आणि त्यांचे कोणते मुद्दे असणार आहेत हे अजून तरी जाहीररीत्या समजले नाही. परिणामी, तालुक्यात विधानसभा निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार हे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.
माजी आमदार रमेश थोरात यांची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने भाजपा आमदार राहुल कुल यांच्यापुढे नेमका कोणता उमेदवार असेल हे सध्यातरी अस्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातून तब्बल 26 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे तालुक्यात 'तुतारी'देखील कमी नाही हे दिसून आले आहे.
हेही वाचा