

पुणे: जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे कामकाज नवीन वर्षात कागद विरहीत (पेपरलेस) होणार आहे. नवीन वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांची कामे कागदविरहित होणार आहे.
याच बरोबर पुणे जिल्हा परिषदेचा कारभार आता ई ऑफिसच्या दिशेने सुरू झाला आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 17 विभागांचा कारभार ऑफलाइन फाइल्स ऐवजी आता ऑनलाइन पद्धतीने सुरू झाला आहे. सुमारे तीन हजारांहून अधिक फाइल्स ऑनलाइन झाल्या असून यामुळे कोणत्या फाइल्सची सद्य:स्थिती आता एका क्लिकवर कळणार आहे.
यामुळे नागरिकांची दिवसेंदिवस रखडणारी कामे वेळेत मार्गी लागणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, कुळकायदा, सर्वसाधारण, निवडणूक, गौण खनिज, पुनर्वसन, भूसंपादन, राजशिष्टाचार, नियोजन समिती, लेखा, राजशिष्टाचार, गृह, संजय गांधी निराधार योजना, नगर परिषद, रोजगार हमी योजना, पुरवठा विभाग, नगर रचना आदी शाखांमधील अधिकार्यांना ई-प्रणालीचा अवलंब करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीला 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहेत.
याबाबत सर्व शाखांमधील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कारकून, अव्वल कारकून यांचे स्वतंत्र सरकारी ई-मेल आयडी बनविण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येकाची डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यात आली नवीन वर्षात 100 टक्के काम पेपरलेस होणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होणारे अर्ज, तसेच महसुली प्रकरणे, दावे, प्रलंबित निकाल आदींची माहिती वेळेवर प्राप्त करण्यासाठी कागदविरहित कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. नववर्षात याचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात येणार असून, पारदर्शकता आणि गतिमानता हाच उद्देश असणार आहे. लवकरच इतर सरकारी कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब करण्यात येईल
राज्य सरकारने आदेश दिल्याप्रमाणे गेल्या सहा महिन्यापासून हळूहळू जिल्हा परिषदेचा कारभार ई ऑफिसच्या माध्यमातून सुरू झाला आहे. सामान्य प्रशासन विभागात 70 टक्के तर अन्य विभागांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत फाईल्सचे काम ऑनलाइन आले आहे. नव्या वर्षात सर्वच विभागा वेगाने सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
नवीन वर्षात रिंग रोडचे काम, शेतकर्यांना सौरपंपवाटप, उद्योजक आणि स्वयंरोजगार निर्मिती रस्ते अपघात रोखण्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रिंग रोड पूर्ण करायचा आहे. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 31 डिसेंबर शेवटचा दिवस होता. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात उर्वरित भूसंपदान करून कामाची सुरुवात करण्याचा संकल्प आहे. तसेच सौर योजनेंंतर्गत शेतकर्यांसाठी मोफत सौरपंप वाटपाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. नवीन वर्षात ते पूर्ण करण्यात येईल. पुणे जिल्हा हा बहुआयामी जिल्हा असून कृषी, उद्योग, स्टार्टअप, आयटी या सगळ्या क्षेत्रातून नव उद्योजक घडवायचे आहे. यासाठी विशेष प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार आहे. वाहतूक आणि रस्ते अपघात रोखण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.
डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी.