

पुणे : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ नावाचे चक्रीवादळ सोमवारी (दि. १६) तयार होणार असून मंगळवारी त्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण किनारपट्टीला १७ ते २२ नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात २० व २१ रोजी फक्त पूर्व विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर भारताकडून थंडी तर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येणार असल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात दाट ते अतिदाट धुके तयार होत असून दृश्यमानता पहाटे अन् रात्रीच्या वेळी कमी होत आहे. त्या शीतलहरी महाराष्ट्रात येत आहेत तर दक्षिण भारताकडून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. या दोन्ही वाऱ्यांचा संगम राज्यावर होत असल्याने १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यात थंडी वाढून किमान तापमानात घट होईल, असा अंदाज आहे.
पुण्याचा पारा १०.२ अंशांवर
रविवारी राज्यात पुणे शहराचे तापमान राज्यात नीचांकी ठरले. शहरातील एनडीए १०.२ अंशांपर्यंत खाली आला होता. त्या पाठोपाठ अहिल्यानगर, नाशिक, गोंदिया, नागपूर येथील किमान तापमान १२ ते १३ अंशांपर्यंत खाली आला होता.
रविवारचे राज्यातील किमान तापमान
पुणे १०.२, नाशिक १२.६, निफाड ११.००, जळगाव १३, महाबळेश्वर १४.६, अहिल्यानगर १४.३, मुंबई २३.५, कोल्हापूर १८.३, रत्नगिरी १९.५, डहाणू १८.५, सांगली १५.६, सातारा १३, सोलापूर १७.३, धाराशिव १५.८, छ.संभाजीनगर १५.८.