

बावडा: गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला धार्मिक कामासाठी नारळाची आवश्यकता असते. या नारळाला श्रीफळदेखील म्हटले जाते. नारळाच्या किरकोळ भावामध्ये आता विक्रमी वाढ झाली आहे. सध्या नारळाच्या एका नगास तब्बल 30 रुपये एवढा भाव द्यावा लागत आहे. बाजारामध्ये वाढती मागणी व पुरवठा यामधील तफावतीमुळे वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी दोन-तीन महिन्यांपूर्वी नारळाचा भाव हा प्रति नगास 20 रुपये होता. आता या महिन्यात अचानकपणे नारळाचे किरकोळ विक्रीचे भाव हे 30 रुपये प्रति नगापर्यंत पोचले आहेत. सध्या गावजत्रांची लगबग सुरू असल्याने नारळाचे भाव जरी विक्रमी वाढले असले तरीदेखील नारळाच्या विक्रीत वाढच झाल्याची माहिती किराणा दुकानदार अथर्व सुक्रे (बावडा) यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात नारळाच्या बागा नसल्या तरी शेताच्या बांधांवर नारळाची झाडे हमखास आहेत. एका झाडास सुमारे 250 ते 300 नारळ लागतात. आता स्थानिक शेतकरीदेखील उत्पादित नारळ प्रतिनगास 20 ते 24 रुपये या चढ्या भावाने स्थानिक दुकानदारांना विकत आहेत. त्यामुळे नारळ उत्पादक शेतकर्यांमध्येदेखील समाधान दिसून येत आहे.
सध्या नारळाच्या भावामध्ये झालेली वाढ ही कायमच टिकून राहील, असा अंदाज व्यापारी नवनाथ पवार (बावडा), योगेश गांधी (खोरोची) यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत, नारळाच्या दरात वाढ झाल्याने सध्या ’कही खुशी कही गम’चे वातावरण समाजामध्ये पहावयास मिळत आहे.