पुणे: पुण्यातील मानाचे गणपती हा सन्मानाचा विषय आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. गणपतीने सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. सर्वांना बुद्धी देवो, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाकडे केली.
फडणवीस यांनी सोमवारी पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. या वेळी फडणवीस यांचा विविध मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (Latest Pune News)
त्यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा या मानाच्या गणपती मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, साई गणेश मित्रमंडळ, सानेगुरुजी तरुण मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले.
गणेश मंडळांना भेटीप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळांचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासने, सानेगुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मंडळांचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.