

आळंदीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्थांमधून बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकिस येऊ लागल्यामुळे आळंदीकर आक्रमक झाले असून त्यांनी या विरोधात एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे.
आळंदीतील अशा बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्था तातडीने बंद करा अशी मागणीच आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेत पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला केली आहे. ग्रामस्थांनी या निमित्ताने बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक घेत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीत येतात. येथे असलेल्या अनेक वारकरी शिक्षण संस्था धर्मादाय कार्यालयात नोंदणी करतात. मात्र, यातील अनेक संस्था अनधिकृत असून त्यांच्यावर कोणताही प्रशासकीय अंकुश नाही. अशा संस्थांमध्ये सेवा-सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याशिवाय, या संस्थांमधील गैरप्रकारामुळे मुलांवरील अत्याचार वाढत आहे.या अनाधिकृत संस्था तातडीने बंद करा अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी आळंदी पोलिसांना दिले आहे.
आपली मागणी मान्य व्हावी यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. त्यांनी सांगितले की, पोलीस विभागही अशा घटनांबाबत संवेदनशील आहे. नुकत्याच घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणावर झालेल्या कारवाईची माहिती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी मागणी केली की, अशा प्रकरणांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहआरोपी करण्यात यावे. पोलीस उपायुक्त पवार यांनी अशा मध्यस्थांना कठोर संदेश दिल्याचे आणि यापुढे अशा प्रकरणांत मध्यस्थी होणार नाही, याची खात्री दिली.ग्रामस्थांच्या मागण्यांमुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, अनधिकृत संस्थांवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.