पुणे : पुढारी वृत्तसेवा : हवामानातील बदल आणि तापमानात होणारी वाढ, ही डेंग्यू पसरविणार्या डासांसाठी पोषक ठरत आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार 27 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, कमी वेळेत अधिक पाऊस पडणे आणि जून ते सप्टेंबरदरम्यान 60 टक्के आर्द्रता असणे, या परिस्थितीत डेंग्यू डोके वर काढतो, असे आमचे निरीक्षण आहे. यानुसार डेंग्यूविषयी पूर्वअंदाज देण्याची प्रणाली आम्ही विकसित केली आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवामान वैज्ञानिक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केले.
भवताल फाउंडेशन, आयसर (पुणे), अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संशोधन प्रोग्रॅम यांच्या संयुक्त विद्यमाने आयसर (पुणे) येथे 18 व 19 जानेवारी रोजी ’हवामान बदल जाणून घेताना’ या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात पुणे, मुंबई, ठाणे, नंदुरबार, पालघर, चिपळूण, सातारा, बारामती अशा वेगवेगळ्या भागांतून आलेले नागरिक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत आयसर (पुणे) येथील डॉ. जॉय मॉन्टेरो, प्रा. छावी माथूर, प्रा. बीजॉय थॉमस, ’आयआयटीएम’मधील संशोधक अदिती मोदी, राज्य सरकारच्या ’स्मार्ट’ प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख, ’भवताल फाउंडेशन’चे संस्थापक अभिजित घोरपडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव, ’भवताल फाउंडेशन’चे समन्वयक वैभव जगताप यांनी मार्गदर्शन केले
प्रा. बीजॉय थॉमस यांनी औद्योगिक क्रांतीनंतर जगाचे वाढलेले सरासरी तापमान आणि त्याचा मानवी शरीर आणि वनस्पती, पिकांवर होणारा परिणाम या विषयावर भाष्य केले. हवा, जमीन आणि समुद्राच्या पाण्याचेही तापमान वाढत असल्याने नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. पाऊस सरासरीएवढा पडत असला, तरी कमीत कमी वेळात अतिवृष्टी, ढगफुटी होत आहे. महापूर येत आहेत. उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.
कमी पाऊसमानामुळे अनेक ठिकाणांचे वाळवंटीकरण होत आहे. अशा आपत्तींना कसे सामोरे जायचे, याची रूपरेषा स्पष्ट करत संस्थात्मक पातळीवर होणार्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. प्रा. छावी माथूर यांनी जलव्यवस्थापनाच्या सुयोग्य पद्धती सांगितल्या.
अदिती मोदी यांनी महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या आव्हांनाबाबत चर्चा केली. जैवविविधतेचे नुकसान, जमिनीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम, दुष्काळाची तीव—ता आणि वारंवारता वाढणे, ओझोनचा स्तर कमी होणे, उष्णतेच्या लाटा, समुद्राच्या पातळीत वाढ व त्यामुळे किनारपट्टीवरील जनतेला असला धोका, जमिनीचे वाळवंटीकरण या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचे आव्हान याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
प्रा. जॉय मोंटेरो यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची उपलब्धता आणि बेसुमार वापर, याबद्दल चिंता व्यक्त केली. जास्त उत्सर्जनाच्या परिस्थितीत सिंचनाची आवश्यकता कमी होत आहे. कदाचित कमी उत्पादनामुळे हा धोका संभवतो. कमी उत्सर्जनाच्या परिस्थितीत तांदळाचे उत्पादन वाढते. परंतु, जास्त उत्सर्जनाच्या वेळी घटते. बाजरीच्या उत्पादनात कमालीची घट होत असल्याचे नमूद करत, सामुदायिक कृती आराखड्याचा विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
डॉ. कोल म्हणाले की, वाढते तापमान आणि चढ-उताराच्या मान्सूनमुळे डेंग्यू वाढत आहे. डेंग्यूसंबंधित मृत्यू भविष्यात वाढू शकतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मान्सूनच्या पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित आहे. अतिवृष्टीमुळे डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतात. परंतु, विकसित केलेले मॉडेल दर्शविते की, उष्ण दिवसांमध्ये होणारी डासांची वाढ डेंग्यूच्या भविष्यातील बदलांवर प्रभाव टाकते. कार्बन उत्सर्जनांतर्गत पुण्यात सरासरी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, भारतातील तापमान आणि आर्द्रता भविष्यात आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हवामानबदल हे वास्तव आहे, त्याबाबत शंकाच नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट हवामानबदलाच्या माथी मारणे योग्य नाही किंबहुना या बदलांच्या काळात आपला निसर्ग-परिसंस्था यांचे संवर्धन करणे, नैसर्गिक प्रवाह सुस्थितीत ठेवणे आणि नागरी सुविधांची अधिक चांगली काळजी घ्यायला हवी, असे केले तरच आपण या संकटाला सामोरे जाण्यास सक्षम होऊ.
अभिजित घोरपडे, संस्थापक, भवताल फाउंडेशन