अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण औद्योगिक परिसराचा श्वास कोंडला आहे. अवजड वाहतुकीला सकाळी व सायंकाळी काही वेळ बंदी तसेच अतिक्रमण कारवाई करून काही प्रमाणात उपाययोजनेचा प्रयत्न झाला. मात्र तो फारसा परिणामकारक ठरलेला नाही. अवजड वाहतूक अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे. अवजड वाहतुकीमुळे होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांचे बळी गेल्याच्या नोंदी पोलिस दप्तरी आहेत.
अवजड वाहने बंदी असलेल्या वेळेतदेखील अवजड वाहने तळेगाव- चाकण ते शिक्रापूर महामार्गावर नियम तोडून बिनदिक्कतपणे शहरात प्रवेश करतात. प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. वाहतुकीचे नियम फक्त कागदावरच आहेत का? बाह्यवळण रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही? आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा नागरिकांचा सवाल आहे.
अवजड वाहनचालकांच्या संघटना वरपर्यंत हातबांधणी करतात. त्यामुळेच अशा वाहनांकडून अपघात झाल्यानंतरसुद्धा त्यांना झुकते माप देण्याचे पाप प्रशासन करत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे.
अवजड वाहनचालकांनी अपघातानंतर नुकसानग्रस्त वाहनचालकाला भरपाई देणे दूरच उलट सामान्य नागरिकांनाच कारवाईची भीती दाखवण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे अवजड वाहनचालक अपघात करून बिनधास्त पळून जातात. अन्य वाहनांचे नुकसान करूनही अरेरावी करत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. अवजड वाहनचालकांच्या मालकांचे नेमके कुणाशी आर्थिक लागेबांधे आहेत? असा सवाल केला जात आहे.
अवजड वाहन प्रवेशबंदीचा निर्णय केवळ कागदावरच राहिला असून, ही वाहने बिनदिक्कत अहोरात्र वाहतूक करतात. लांबलचक आकाराच्या या वाहनांची तपासणी तसेच वाहनात क्षमतेपेक्षा जादा माल आहे का, याचीही पाहणी होत नाही. या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघातांचे प्रमाण वाढले असतानाही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. या वाहनांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य कुणीही दाखवत नाही. कारवाईसाठी कोणतेच नियोजन नसल्याने अवजड वाहतुकीचा विषय चाकण परिसरात धोकादायक झाला आहे.