

पौड (ता. मुळशी) येथील विठ्ठलवाडी फाटा (ओंबळेवाडा) येथील राजेंद्र ओंबळे यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने मागील दरवाजाने शिरलेल्या चोराला येथील नागरिकांनी मंगळवारी (दि. 8) रात्री तीन वाजेच्या दरम्यान पकडले. यामध्ये सापडलेल्या शरद अर्कास काळे (मूळ रा. नगर) याला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र ओंबळे हे रात्री झोपलेले असताना त्यांना मागील बाजूच्या दरवाजातून कोणीतरी आत आल्याचा आवाज आला. ओंबळे यांनी आजूबाजूला राहणार्यांना या घटनेची माहिती फोनवरून दिली. नंतर या सर्व जणांनी या चोरी करणार्यांना गाठले. यातील तीन जण एका दिशेला पळून गेले तर एक शरद काळे दुसर्या बाजूला पळाला. दुसर्या बाजूला पळालेल्या शरदचा नागरिकांनी पाठलाग करीत त्याला पकडले. या वेळी चिडलेल्या नागरिकांनी त्याला लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. या वेळी त्याचे तीन साथीदार पळून गेले.
या चार जणांनी ओंबळे यांच्या घरातील पँटच्या खिशातून साडेनऊ हजार रुपये काढले तसेच नंतर नागरिकांना एअरगनचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. सापडलेला शरद काळे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले आहेत.