

अमृत भांडवलकर
सासवड: पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले सासवड शहर अत्यंत झपाट्याने विकसित होत आहे. या सासवड नगरपालिकेवर 17 फेब्रुवारी 2022 पासून सुमारे तीन वर्षे प्रशासकीय अधिकारी कामकाज पाहत आहेत. या कामकाजामध्ये सातत्य नसल्याने सासवडकर नागरिक संतप्त झाले आहेत. अधिकारी, कर्मचार्यांच्या मनमानीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासक व अधिकार्यांच्या हाती सूत्रे असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
सासवड शहर येणार्या कालावधीत अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येणार आहे. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या प्रकल्पांमुळे शहराला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी रस्ते, गटार, वीज आणि उद्याने अशा सर्व सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
सासवड शहरात कार्डियाक रुग्णवाहिका आणि शववाहिनी नाही. अद्ययावत अग्निशमन यंत्रणा नाही. नगरपरिषद हद्दीत प्रशासकीय कारकिर्दीत बोजवारा उडालेल्या पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य सुविधेबाबत तीव्र रोष व्यक्त होत असून नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. चोहीकडे रस्त्यावर भरणारे भाजी बाजार आणि अतिक्रमणांकडे मुख्याधिकार्यांचे लक्ष नाही.
नगरपरिषदेच्या पाणी, रस्ते आणि आरोग्य यंत्रणेचे अक्षरश: वाभाडे निघाले. दरवेळी तीच-तीच उत्तरे ऐकून लोक वैतागलेत. नागरिकांच्या हक्काच्या मूलभूत सुविधांसाठी वारंवार ये-जा करावी लागते. या अधिकार्यांवर व कर्मचार्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.
त्यांना लगाम घालणे गरजेचे आहे. शहरातील महत्त्वाच्या भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून देखील याकडे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढू लागल्याने शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सासवड शहराला सध्या गराडे व घोरवडी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु या धरणांची पाणी पातळी कमी होत चालली आहे.
मागील सात महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परंतु, हा पाणीपुरवठा योग्य दाबाने होत नसल्याने अनेक नागरिकांना पाणी कमी मिळते. येणार्या काळात सासवड शहरात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावू शकतो. शहरातील काही कामे अर्धवट अवस्थेत आहेत, ती तातडीने मार्गी लावावीत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
सासवड शहराच्या वाढीव हद्दीतील लोकसंख्येचा विचार करून राज्य
शासनाने मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 रोजी 58 कोटी 13 लाख रुपये खर्चाची भुयारी गटार योजना मंजूर केली व कामासाठी पहिला टप्पा 36 कोटी 53 लाखांचा आहे. परंतु सासवड नगरपालिकेची भुयारी गटार योजनेची मुदत संपलेली असून उघड्यावर सांडपाणी व मैलापाणी सोडून दिले जात आहे. ही योजना अर्धवट अवस्थेत आहे.
कचर्याच्या ढिगार्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सासवड नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपुष्टात आला. सन 2016 मध्ये नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला होता. प्रभागनिहाय अन्य सदस्य निवडून आले होते.
आपापल्या प्रभागातील समस्या सुटाव्यात, नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नगरसेवक नेहमीच दक्ष राहायचे. सध्या सासवड शहरात पाणी, रस्ता, वीज आणि कचर्याचा प्रश्न फार गंभीर झाला आहे. शहरात सर्वत्र कचर्याचे ढीग साचले आहेत. जागोजागी कचर्याचे ढीग असल्याने दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.