वाल्हे: मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता अधिक वाढत असून, याचा फटका माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांनादेखील बसत आहे. वाढत्या उन्हामुळे दररोज कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. परिणामी, पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.
मागील वर्षी 1 हजार पक्ष्यांमागे 5 ते 6 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. या वर्षी वातावरणात मोठा बदल झाला असून, दररोज किमान एक हजार पक्ष्यांमागे 8 ते 10 कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याचे व्यावसायिक सत्यवान सूर्यवंशी, विनय पवार यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून अंगाची लाहीलाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरत आहे. पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी जास्त प्रमाणात वाढले असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.
उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाल्हे व परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. तापमान 39 अंशांच्या जवळपास गेल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेच, सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे. वाढत्या उष्णतेने कोंबड्यांचे वजन वाढत नसल्याने त्यांचे हवे तसे मूल्य मिळत नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते. त्यामुळे कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यातच सध्या नैसर्गिक संकटासोबतच कंपनीमुळे देखील पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये लावले कुलर
उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी वाल्हे परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत, उसाचे पाचट, तसेच नारळाच्या फांद्याही अंथरल्या आहेत. पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फोगर, स्प्रिंकलर, फॅन, कुलर आदी उपाययोजना केल्या आहेत. उन्हापासून पक्ष्यांच्या संरक्षणासाठी या उपाययोजना केल्याने कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.
उष्णतेपासून पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी शेडमध्ये फॉगरची सुविधा केली आहे. पोल्ट्री शेडमध्ये पंखा, कुलर, फॉगर, स्प्रिंकलर आदींचा प्रयोग करूनही प्रयत्न वाया जात आहेत. उन्हाळ्यात भारनियमन होत असल्याने जनरेटर सुरू करावा लागत असल्याने डिझेलचा खर्च वाढत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटर सुरू करेपर्यंत उष्णता वाढत आहे.
- विनय पवार, पोल्ट्री व्यावसायिक, आडाचीवाडी
अतिउष्णतेने पक्ष्यांचे वजन घटत आहे. दिवसा प्रचंड उन्ह पडत असल्याचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी व शेतातील पिकांची हानी होत आहे. कोंबडीची पिले फार नाजूक असतात. त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे दिवसभर पोल्ट्रीमध्ये फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कोंबड्यांवर वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला आहे. या समस्या निर्माण होत असल्यामुळे परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. यामधून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक वाढला असल्याने पोल्टी व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
- सत्यवान सूर्यवंशी, पोल्ट्री व्यावसायिक, वाल्हे