छोटा शेख सल्ला उरूस | येथे जपली जाते 686 वर्षांपासून नाचणीच्या भाकरीची परंपरा..!

छोटा शेख सल्ला उरूस | येथे जपली जाते 686 वर्षांपासून नाचणीच्या भाकरीची परंपरा..!
Published on
Updated on

कसबा पेठ : दरवर्षी हजरत ख्वाजा (छोटा शेख सल्ला) उरसाला नाचणीची भाकरी, चवळईची भाजी व कांदा हा नैवेद्य श्री जुना काळभैरवनाथ मंदिरातून बाबांच्या दर्ग्यात मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढून अर्पण केला जातो. छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे घराण्यापासून सुरू असलेली नाचणीची भाकरी परंपरा 686 वर्षांपासून अखंडपणे सुरू असल्याचे मानकरी अमित देवरकर यांनी सांगितले.

हिंदू-मुस्लिम एकोप्याचे प्रतीक असलेल्या या उरसात मंगळवारी (दि.14) नाचणीची भाकरी मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. जुन्या काळभैरवनाथ मंदिरापासून त्रिमूर्ती मित्रमंडळ, गावकोस मित्रमंडळ, फडके हौद, व्यवहार आळी, शिंपी आळी, पवळे चौकमार्गे ख्वाजासाहब दर्ग्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी अनेक मंडळे, कार्यकर्ते, शेरा व चादर अर्पण करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात दर्ग्यात येताना दिसले.

आजही नवस फेडायला उरसाला भाविकांची गर्दी होते. भाविक नवस करून तो पूर्ण झाल्यावर जरब टोचून घेतात. या मिरवणुकीत भस्मराज त्रिकोणे, परवेज तांबोळी, शाकीर शेख, नागेश खडके यांच्यासह परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. बुधवारी खीर वाटप व बहारदार कव्वालीच्या कार्यक्रमांनी आठवडाभर सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता होणार आहे.

शेख सल्लाऊद्दीन बाबा यांनी देवरकरबाग (जुना बाजार) येथे गेणूजी देवरकर यांचे बैल जिवंत केले होते व नाचणीची भाकरी, चवळई भाजीचे जेवण केले होते. तसेच समाधीनंतरसुद्धा सदर जेवण मला द्यावे, असे सांगितले होते. तेव्हापासून आजपर्यंत 686 वर्षे ही परंपरा सुरू आहे. आमची ही 27 वी पिढी आहे. शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांपर्यंत पीरबाबांच्या दिवाबत्ती व उरुसासाठी इनाम दिलेले आहे. उरसात हिंदू-मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने सामील होतात. मिरवणूक श्री जुना काळभैरवनाथ मंदिरातून सुरू होते व दर्ग्यात संपन्न होते.

– अमित देवरकर, मानकरी नाचणीची भाकरी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news