

पुणे: महापालिकेचा सूस येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प तत्काळ बंद करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने महापालिकेची आता चांगलीच कोंडी झाली आहे. हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करणे शक्य नसून अशा पध्दतीने सर्वच भागांतील कचरा प्रकल्पांना विरोध होऊ शकतो, अशी भूमिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली. यासंबंधीचा अंतिम निर्णय आयुक्त घेतील, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
सूस रस्त्यावर ओल्या कचर्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प महापालिकेने उभारला आहे. मात्र, या प्रकल्पामुळे या भागातील रहिवाशांना त्रास होत असल्याने तो बंद करावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. या प्रकल्पाविरोधात येथील रहिवाशांनी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे.
त्यावर येथील रहिवाशांनी मंत्री पाटील यांच्याकडे हा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी केली होती. याबाबत जानेवारी 2024 मध्ये सदर प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करून नांदे-चांदे येथे तो स्थलांतरित करू, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, नांदे-चांदे येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने त्यावर काहीच कार्यवाही झाली नव्हती.
यासंदर्भात मंत्री पाटील यांनी गुरुवारी घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांच्यासह अधिकार्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी कदम यांची झाडाझडती घेत आजच प्रकल्प बंद न झाल्यास उद्या सदर प्रकल्पाविरोधात खुर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.
दरम्यान, मंत्री पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता सूस प्रकल्पाबाबत काय निर्णय घ्यायचा? असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रकल्पामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हा प्रकल्प चालविण्यासाठी 2042 पर्यंतचा करार महापालिकेने केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद केल्यास त्याचे दायित्व महापालिकेवर येईल तसेच भविष्यात शहरातील अन्य भागांतील कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी झाल्यास कचर्याचा प्रश्न वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.