

Maharashtra Politics: महायुती सरकारच्या रविवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट तर पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
दरम्यान, अजित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जिल्ह्यातून एकूण चार मंत्र्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहर व जिल्ह्याच्या विकासाला चांगली गती मिळू शकणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शहरातील आठपैकी सात जागा जिंकून महायुतीने नेत्रदीपक यश मिळविले होते. त्यामुळे या वेळी पुण्याला किमान दोन मंत्रीपदे मिळतील, अशी चर्चा होती. त्यानुसार कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना अपेक्षेनुसार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. पर्वती मतदारसंघातून सलग चौथ्यावेळी आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली गेली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद भूषविले होते. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये भाजपने केंद्रीय राज्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे केंद्रात एक आणि राज्यात दोन अशी तीन मंत्रीपदे पुण्याच्या वाट्याला आली आहेत. याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने शहर व जिल्ह्यात तब्बल पाच मंत्रीपदे आली आहेत.
इंदापुरात जल्लोष
इंदापूर तालुक्याचे तिसर्यांदा प्रतिनिधित्व करणारे आमदार दत्तात्रय भरणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच इंदापूरकरांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. सन 2019 मध्ये भरणे यांनी सार्वजनिक बांधकाम, वन, दुग्ध, पशुसंवर्धन तसेच मत्स्य या खात्यांसह राज्यमंत्रीपद भूषविले होते. तसेच, ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते.