

राजगुरुनगर: चांडोली (ता. राजगुरुनगर) येथील मागासवर्गीय दफनभूमीवरील अतिक्रमण भीम शक्ती संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १४) जमीनदोस्त केले. मागासवर्गीय दफन भूमीची जागा असताना येथे सिमेंट खांब, खिडक्या व इतर साहित्य बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता.
सर्व शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन, आंदोलन करून उपयोग झाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट अतिक्रमण विरोधी कारवाई हातात घेऊन ठोक आंदोलन केले.
जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या दर्शनी ठिकाणी आणि भीमा नदीच्या काठावर ६८ गुंठे ही जागा आहे. यातील १७ गुंठे जागा खासगी मालकाची असुन उर्वरित ५१ गुंठ्यांत अतिक्रमण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाल्यावर जागेचे तारेचे कुंपण उखडून हा परिसर मागासवर्गीय नागरिकांसाठी दफनभूमी म्हणुन खुला करण्यात आला होता. काही कालावधीनंतर पुन्हा अतिक्रमण झाले. या प्रकरणी सन २०१२ मध्ये देखील मोठे आंदोलन झाले होते.
त्यावर कारवाई होत नसल्याने मंगळवारी कार्यकर्त्यांनी थेट अतिक्रमण विरोधी कारवाई केली. या कारवाईत कारखान्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. याशिवाय कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विधिपूर्वक स्थापना केली. यावेळी शासकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती राजगुरुनगर शहर परिसरात उत्साहात साजरी झाली.
या जयंतीनिमित्त एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी दफनभूमीवरील अतिक्रमणावर चर्चा केली, चांडोली येथे दुपारी एक वाजता कार्यकर्ते एकत्र आले. भर उन्हात झेंडे दाखवत ते दफनभूमी परिसरात आले. येथे असलेले कारखानदार, कामगार यांना चाहूल लागल्याने ते अगोदरच पळून गेले होते. आंदोलकांनी शेड जमीनदोस्त करीत थेट कारवाई केली. अनिल जाधव, किशोर डोळस, मंगेश जाधव, डॉ नीता आल्हाट, कांताराम सोनवणे, सुरेश सोनवणे, दत्ता गोतारने, मंगेश शिंदे, बाळु वाघमारे, नितेश वाघमारे, सिद्धार्थ भालेराव, पोपट शिंदे, दिलीप शिंदे, सविता शिंदे आदींसह जवळपास २०० कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.