केंद्रीय सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांचा घेराव

जीबीएसच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी चर्चा
Pune News
केंद्रीय सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांचा घेरावPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दूषित पाण्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जीबीएसच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले. पथकातील तज्ज्ञ गुरुवारी नांदेड सिटी येथील विहिरीची पाहणी करण्यासाठी गेले होते. ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली आणि संताप व्यक्त केला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

केंद्रीय पथकाने सर्वप्रथम धायरी येथील लायगुडे रुग्णालयाला भेट दिली. पथकाकडून सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या टीममधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सूचना केल्या. त्यानंतर तज्ज्ञ विहिरीची पाहणी करण्यासाठी गेले. ग्रामस्थांनी तेथे खूप गर्दी केली होती, त्यांच्या गाड्या अडवल्या.

घेराव घातल्याने पथकाच्या कामात अडचणी आल्या. दुसरीकडे, पथक पाहणी न करता पळून जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे नांदेड गाव परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती पहायला मिळाली. सरतेशेवटी, पथकाने पाहणी करून तिथून लवकर निघून जाणे पसंत केले.

तत्पूर्वी, पथकाने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. पाणीपुरवठा विभागाचे मंदार देशपांडे, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता रामदास तारु यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पाचशेहून नागरिकांनी विहिरीवर सकाळपासूनच गर्दी केली होती. प्रचंड गर्दी पाहून पथक माघारी फिरले. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी घेराव घालून विहिरीची पाहणी करण्याची विनंती केली.

जीबीएसची साथ नेमक्या कोणत्या कारणाने सुरू झाली आहे, याचे मुख्य कारण शोधले पाहिजे. अनेक जण पाण्याचे शुद्धीकरण करून पाणी पित आहेत. त्यांनाही रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे नेमके कारण प्रशासनाने शोधून काढले पाहिजे.

- रूपेश घुले, उपाध्यक्ष, भाजप, खडकवासला

आम्ही शास्त्रज्ञ असून, परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करणे, हे आमचे काम आहे. आम्ही पाहणी करण्यासाठी आलो आहोत आणि सध्या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहोत. राज्याच्या समन्वयातून केंद्रीय पथक काम करत आहे. आजाराचा उद्रेक होण्याचे कारण, रुग्णांची सद्यःस्थिती, उपचाराबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. विहिरीतील पाण्याचे नमुने घेतल्यानंतर आम्ही त्याबाबत भाष्य करू शकू.

- पथकातील तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news