

दीपक नायक
वाघोली: विविध गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी चोरटे लक्ष्य करत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत सीसीटीव्ही बसवण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे वाघोली पोलिस ठाण्याच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानिमित्त या पोलिस ठाण्यात ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाघोलीतील श्रीवाघेश्वर मंदिर, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा, बकोरी फाटा आदी चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ग्रामपंचायत असताना सर्वच चौकांतील कॅमेरे व्यवस्थित सुरू होते. विविध गुन्ह्यांतील आरोपींचा तपास करण्यासाठी पोलिसांना कॅमेर्यांमुळे मदत होते. परंतु वाघोली महापालिकेत गेल्यानंतर कॅमेर्यांच्या दुरुस्ती, देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गावरील अनेक चौकांतील व महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना तपास करताना रस्त्यालगत असणार्या व्यावसायिकांकडे असणार्या कॅमेर्यांची मदत घ्यावी लागत आहे. अनेकवेळा व्यापारी, दुकानदार, शाळा, व्यावसायिक सुरक्षिततेसाठी त्यांच्या मर्यादित परिसराचेच चित्रीकरण होईल अशा पद्धतीने कॅमेरे बसवतात. महामार्गावर काही घटना घडल्यास किंवा एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घ्यायचा असल्यास कॅमेर्यांमध्ये महामार्गाचे कार्यक्षेत्र येत नसल्याने तपासात अडचणी निर्माण होऊ शकतात.
घरे, सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, हॉस्टेल आदींच्या प्रवेशद्वारांवर आणि पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत. परंतु गंभीर बाबा म्हणजे वाघोली पोलिस ठाण्यामधील कॅमेर बंद आहेत. काही महिन्यांपूर्वीच वाघोली पोलिस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याची घटना घडली होती. त्यामध्ये एका तरुणाला जीव देखील गमवावा लागला.
एवढेच नव्हे, तर एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. रात्रभर पोलिस यंत्रणा शोध घेत होती, परंतु मिळून येत नव्हता. सुदैवाने एका नागरिकाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. कॅमेरे चालू असते, तर किमान तो कोणत्या दिशेने पळाला याचा शोध घेता आला असता.
स्मार्ट सिटीअंतर्गत खराडी बायपासपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु, वाघोलीत पुणे-नगर महामार्गावर कोणत्याही चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. याबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार देखील केला आहे.
- गजानन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा, वाघोली
वाघोली पोलिस ठाण्यातील कॅमेरे अद्याप सुरू नाहीत. याबाबत पत्र दिले असून, लवकरच सुरू होतील.
- पंडित रेजितवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाघोली