

बारामती: ‘मी बारामतीचा भाई आहे. मला उधारी मागतो का?’ असे म्हणत एकाला बेदम मारहाण करत त्याच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षद राजू काकडे ऊर्फ बागवान (रा. आमराई, बारामती) आणि अमर सोनवणे ऊर्फ पिन्या (पत्ता नमूद नाही) या दोघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रोहित मिलिंद बनसोडे (वय 25, रा. हरिकृपानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे येथील हॉटेल चैत्रालीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. तेथे अनेकदा हर्षद बागवान याने हातात लाकडी दांडके, लोखंडी हत्यारे घेऊन येत जबरदस्तीने वस्तू व पैसे नेले आहेत.
हॉटेलातून फुकट दारू जबरदस्तीने नेली होती. त्याच्या दहशतीमुळे तक्रार दाखल केली नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्याने हॉटेलातून 700 रुपयांची दारू नेली होती. त्याची उधारी फिर्यादीने त्याला मागितली होती. त्यावर त्याने ‘मी बारामतीतील गुंड असून, सगळे मला हर्षाभाई बोलतात, मला कोणताच दुकानदार उधारी मागत नसताना तू कसा काय मागतो. तुला बारामतीत राहायचे आहे की नाही?’ अशी धमकी देत शिवीगाळ केली होती.
दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी हे आई व पुतणीसह पूनावाला गार्डनसमोर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी या दोघांनी दुचाकीवरून तेथे येत शिवीगाळ करत ‘उधारी का मागतो?’ असे म्हणत मारहाण केली.
‘आम्ही बारामतीतील गुंड आहोत, पोलिस स्टेशनला जाऊन आमचे रेकॉर्ड तपास, आमच्या नादाला लागू नको,’ अशी धमकी या वेळी देण्यात आली. तसेच फिर्यादीच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले. फिर्यादीच्या आईने आरडाओरडा केल्यावर अन्य लोक तेथे मदतीला आले. त्यांनाही शिवीगाळ करत ते दोघे दुचाकीवरून निघून गेले.